राजश्री एण्टरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स प्रस्तुत कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'पाणी' (Paani Movie) चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटातून अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा जोनस(Priyanka Chopra Jonas)ने केली आहे. नुकतेच एका मुलाखतीत प्रियांकाने तिला या चित्रपटाची कोणती गोष्ट भावली, याबद्दल सांगितले.
'पाणी' ही हनुमंत केंद्रे यांची कथा आहे. हनुमंत हे राज्यात 'जलदूत' म्हणून ओळखला जातात. हनुमंत केंद्रे यांचे मराठवाड्यातील दुष्काळी भागातील अनोखं कार्य या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आदिनाथ कोठारे त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रियांका चोप्राने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी पहिल्यांदा या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा मला यातल्या बऱ्याच गोष्ट खूप भावल्या. संगीत आणि कथा खूप सुंदर आहे आणि खूप उत्तमरित्या चित्रपट रेखाटला आहे. पाणी टंचाई ही समस्या अधोरेखित करणे, हा चित्रपट बनवण्यामागचा उद्देश होता. मनोरंजनासोबत या भीषण समस्या मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.
'पाणी'ची स्टारकास्ट आणि रिलीज डेट आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी 'पाणी' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.