दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर आता चर्चा रंगली आहे ती प्रियांका चोप्राच्या लग्नाची. दीपिका आणि रणवीर यांनी इटलीत जाऊन लग्न करण्यास पसंती दिली तर प्रियांका भारतात लग्न करत आहे. प्रियांकाचे लग्न २ डिसेंबरला असून लग्नापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. प्रियांका तिचा प्रियकर निक जोनाससोबत राजस्थानधील उमेद भवन येथे लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. लग्नात कोणतीच कमतरता येऊ नये यासाठी चोप्रा कुटुंबातील प्रत्येकजण स्वतः लग्नाच्या तयारीकडे लक्ष देत आहेत. अलीकडे प्रियांका चोप्रा आई मधू चोप्रासोबत जोधपूरला गेली होती. येथे त्यांनी उमेद भवनमध्ये सुरू असलेल्या लग्नाच्या तयारीची पाहणी केली.
उमेद भवन हे भारतातील प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे. उमेद भवन हा पू्र्वी राजमहाल होता. पण आता त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. उमेद भवन अतिशय भव्य असून त्याची सजावट ही अतिशय सुंदर आहे. उमेद भवन हे मोठाले असून त्यात सगळ्या आधुनिक सुविधा देखील आहे.
त्यामुळे याचे भाडे देखील प्रचंड आहे. उमेद भवनचे केवळ एका रात्रीचे भाडे ४३ लाख असल्याचे म्हटले जात आहे. या पॅलेसमध्ये विविध सुट असून त्यांच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. प्रियांका चोप्राच्या कुटुंबियांनी या हॉटेलमध्ये ६५ रुम बुक केल्या आहेत.
तेथील एका रूमचे भाडे ६६ हजार रुपये आहे. या महलमधील महाराणी सुट सगळ्यात खास असून प्रियांका-निक यांच्यासाठी हा सुट घेण्यात आला आहे. लग्न झाल्यानंतर ते दोघे तिथेच थांबणार असल्याचे म्हटले जात आहे.
निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले आहेत. प्रियांका आणि निक यांनी आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.
निक गुरुवारी भारतात दाखल झाला असून प्रियांकानेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना हे सांगितले आहे.