Zol zaal Marathi Movie : अमोल कागणे ( Amol Kagane ) हा निर्माता म्हणून महाराष्ट्रातील जनतेला परिचित होता. हलाल, भोंगा, बेफाम, वाजवूया बँड बाजा, लेथ जोशी यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती त्यानं केली. पाठोपाठ ‘बाबो’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आता पुन्हा एकदा नव्या कोऱ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. उद्या 1 जुलैला ‘झोलझाल’ ( Zolzaal ) हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात अमोल कागणे कॉमेडीचा तडका लावताना दिसणार आहे.
तुम्हाला ठाऊक नसेल पण मेडिकलचं शेवटचं वर्ष संपलं आणि अमोलने पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्रासाठी प्रवेश घेतला. कारण त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मुंबईत तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आला. पण झाला निर्माता. केवळ निर्माता नाही तर मोठा निर्माता. पण आताश: तो अभिनयातही रमला आहे. अर्थात यासाठी त्याने आधी अभिनयाचे सगळे बारकावे शिकले आणि मगच या क्षेत्रात उडी घेतली. आत्तापर्यंत बॅक ऑफ द कॅमेरा रमणारा अमोल सध्या फ्रंट कॅमेरा एन्जॉय करतोय.
पहिल्यांदाच कॉमेडी...‘झोलझाल’ या चित्रपटात अमोल जय ही व्यक्तिरेखा साकारत आहे. जय आणि वीरूची ही गोष्ट आहे. जय हा वीरूचा मोठा भाऊ असून तो त्याच्या प्रत्येक गोष्टीत वीरूला सहभागी करतो. चित्रपटातील प्रत्येक सिन हा कॉमेडी आहे. अमोलने पहिल्यांदाच या चित्रपटातून विनोदी भूमिका साकारली आहे. याआधी अमोलने गंभीर भूमिकांमध्ये किंवा आशयघन कथांमध्ये काम केलं आहे.
‘झोलझाल’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर अमोल भरभरून बोलला. तो म्हणाला, एक विनोदी अभिनेता साकारणं खरंच खूप अवघड बाब आहे आणि मी विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येतोय ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. ‘झोलझाल’ हा सिनेमा मल्टीस्टारर आहे. मनोज जोशी, मंगेश देसाई, उदय टिकेकर यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. या सर्व अनुभवी कलाकारांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि त्यामुळे आमच्यावरील दडपणही कमी झालं. शिवाय चित्रपटाचा दिग्दर्शक मानस कुमार दास हा गमतीशीर आणि कॉमेडी असल्याने त्याने हसत हसत आमच्याकडून सर्व सीन काढून घेतले. उद्या 1 जुलैला ‘झोलझाल’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्ब्ल 22 कलाकारांनी मिळून काय झोल केलाय हे पाहायला अर्थातच तुम्हाला चित्रपटगृहात जावं लागेल.
या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे कलाकार झळकणार आहेत.