मुंबई - हो, बॉलिवूडमध्ये सुद्धा कास्टिंग काऊच होत. एखाद्या चित्रपटात महत्वाची भूमिका हवी असल्यास काही निर्माते नवोदीत कलाकारांना ‘कॉम्प्रोमाईझ’ करण्यास सांगतात अशी स्पष्ट कबुली अभिनेत्री विद्या बालनने दिली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलताना विद्याने बॉलिवूडमध्ये होणा-या कास्टिंग काऊचची कबुली दिली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये वावरताना आपल्याला कधी असा अनुभव आला नसल्याचेही तिने सांगितले. विद्या सध्या ‘तुम्हारी सुलु’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
काही दिवसांपूर्वी मेरी क्लेअर पॉवर ट्रिप या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडच नाही बॉलिवूडमध्येही लैंगिक शोषण होत असल्याचा खुलासा केला होता. प्रियंकाला हार्वे वेन्स्टाइनच्या लैंगिक शोषणाबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, हार्वे वेन्स्टाइनच्या प्रवृत्तीची लोक सगळीकडेच आहेत.
ही फक्त सेक्सपुरती मर्यादित गोष्ट नाही, खरंतर हा त्यांच्या क्षेत्रातील ताकदीचा विषय आहे. हे फक्त हॉलिवूडमधल्या हार्वे यांच्यापर्यंतच मर्यादित नाही, तर बॉलिवूडमध्येही असे प्रकार सर्रास घडत असतात. हार्वेसारखी लोक बॉलिवूडमध्येही आहेत, असंही प्रियंका म्हणाली होती. विद्या बालनने पुरुषांना दृष्टी बदलण्याचा, मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला.