Baazigar Sequel: 'बाजीगर' हा एव्हरग्रीन चित्रपट म्हणून ओळखला जातो. १९९३ साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. या सिनेमात शाहरुख खानने साकारलेली खालनायकाची भूमिका आजही चित्रपटसृष्टीतील त्याच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. काळ बदलला असला तरी या चित्रपटांची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे. आता या सिनेमाच्या सीक्वेलबद्दल एक अपडेट समोर आलं आहे.
'बाजीगर'चा सीक्वेल येणार, या बातमीला चित्रपटाचे निर्माते रजत जैन यांनी दुजोरा दिला आहे. अलीकडेच ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रतन जैन यांनी सांगितले की, 'बाजीगर'च्या सिक्वेलबाबत शाहरुख खानशी चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अद्याप तयार झालेली नाही, मात्र शाहरुख खानने या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करण्यास सहमती दर्शवल्यास सिक्वेलवर काम करतील.
रजत जैन म्हणाले, "सिक्वेलबाबत एक रोमांचक कल्पना देखील आहे. आमची टीम कथेवर चांगले काम करत असून येत्या काळात लोकांना 'बाजीगर'चा सीक्वल नक्कीच पाहायला मिळेल. पण उत्कृष्ट स्क्रिप्टशिवाय चित्रपटाला नव्या दिग्दर्शनाची गरज आहे". आता ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांमध्येही चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
बाजीगरच्या सिक्वेलची शाहरुखशिवाय कल्पनाही करता येणार नाही. शाहरुख खान 'बाजीगर'च्या सिक्वेलला होकार देतो की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. 'बाजीगर' चित्रपटात शाहरुखबरोबरच काजोल, शिल्पा शेट्टी, दिलीप ताहिल, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ राय या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 'बाजीगर'मधील 'ये काली काली आखें', 'बाजीगर ओ बाजीगर' ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.