पॅरिस येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये आणिबाणी लागू करण्यात आली आहे. याचे पडसाद सर्व क्षेत्रातून उमटू लागले आहे. राजकारण्यांसह सेलिबे्रटींनी देखील याचा निषेध नोंदविला आहे. ट्विटरवरून ‘प्रे फ ॉर पॅरिस’ या ट्रेन्डखाली अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी आपला निषेध नोंदवित जखमी व मृतांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे. चर्चा करून प्रश्न सोडविण्याची पद्धतच संपत चालल्याबद्दल दु:खही व्यक्त करण्यात आले आहे. प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, वरुण धवन, प्रीती झिंटा, नेहा धुपिया, आयुष्यमान खुराना यांनी ‘#प्रे फार पॅरिस’ या हॅश टॅग खाली आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. महेश मांजरेकर, विक्रम गोखले, तेजस्विनी पंडीत यांनीही आपली मते मांडली आहेत.असे हे हल्ले भारतानेही सहन केले आहेत. हे सगळंच खूप भयानक आहे. आधी भारतात झालं, आता पॅरिसमध्ये झालंय. त्यामुळे जगात आता हे कधीही कुठेही होऊ शकतं. पूर्वी लष्कर ए तैयबा होती आता इसिस आहे. हे सगळं वाढतच चाललं आहे. आणि त्याची झळ सामान्य माणसापर्यंत पोचायला लागली आहे. सर्व देशांनी या दहशतवादाविरोधात लढलं पाहिजे.- चिन्मय मांडलेकर, अभिनेता दहशतवादी संघटनांना बलाढ्य राष्ट्रेच मदत करतात हे आता ओपन सिक्रेट आहे. जगात कुठेही जात, भाषा प्रांत यावरून आक्रमण झालेली नाहीत असे नाही. त्यामुळे आमच्या देशात ईसीझम नाही असे कुणीही म्हणूच शकत नाही. गोळ्यांनी गोळ्यांना उत्तर देणे अशक्य आहे यासाठी माणूस नावाच्या प्राण्यातच आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे.- विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते पॅरिसच काय भारत, अफगाणिस्तान अशा सर्वच ठिकाणी होणारे हल्ले हे निषेधार्ह आहेत. पण भारतासारख्या देशात असंतुष्ट लोक असे हल्ले करतात असं म्हटलं जातं. पण पॅरिससारख्या ठिकाणी जिथे संतुष्ट लोक राहतात असं आपण म्हणतो तिथेही दहशतवादी हल्ले होत आहेत म्हटल्यावर त्याचा अधिक विचार करणे जरूरीचे आहे असे वाटते. यामध्ये निष्पाप लोकांचा हकनाक बळी जात आहे. संयम आणि चर्चा करून समस्या सोडवण्याची पद्धत संपत चालली आहे असं वाटायला लागलं आहे.- सलील कुलकर्णी, गायक-संगीतकारमाझ्या मते दहशतवादाला काहीही कारण असूच शकत नाही. हे हल्ले उगाच केले जात आहेत. त्यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यांच्यासाठी खरोखरच जीव तुटतो. सगळ्या देशांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.- तेजस्विनी पंडित, अभिनेत्री पॅरिसवरील हल्ला हा मानवतेविरुद्ध केलेला हल्ला आहे़ ही एक अतिशय वाईट गोष्ट आहे़ त्याचा जितका कठोरपणे निषेध करावा तेवढा थोडाच आहे़ दहशतवादी संघटना आता सर्वत्र फोफावत चालल्या आहेत़ या दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे़ - महेश मांजरेकर, निर्माता-दिग्दर्शक
पॅरिसच्या हल्ल्याचा चित्रपटसृष्टीतून निषेध
By admin | Published: November 15, 2015 12:10 AM