Join us  

सेलीब्रिटींचे सार्वजनिक जीवन आणि प्रायव्हसीचा प्रश्न

By admin | Published: March 13, 2016 2:42 AM

गेल्या काही दिवसांत दोन बड्या अभिनेत्रींनी लग्न केल्याच्या अचानक बातम्या आल्या. प्रथम प्रीती झिंटा आणि नंतर ऊर्मिला मातोंडकर यांचा त्यात समावेश आहे.

गेल्या काही दिवसांत दोन बड्या अभिनेत्रींनी लग्न केल्याच्या अचानक बातम्या आल्या. प्रथम प्रीती झिंटा आणि नंतर ऊर्मिला मातोंडकर यांचा त्यात समावेश आहे. नवीन जीवनाला सुरुवात केल्याबद्दल प्रथम त्यांना शुभेच्छा. या दोघींच्याही लग्नाबद्दल प्रदीर्घ काळापासून तर्कवितर्क चालू होते. विशेषत: प्रीती झिंटा याबाबतचे तर्क नेहमीच फेटाळून लावत होती. उलट आपण जेव्हा केव्हा करू ते जगजाहीर करू आणि थाटात करू, असे ती सांगत असे; पण सातासमुद्रापार लग्न केल्यानंतर तिच्या जीवनाचे सत्य अचानक बाहेर आले. कोणत्याही व्यक्तीचा विवाह हा त्याचा खासगी निर्णय असतो, या तर्काशी आपण सहमत होऊ शकतो. लग्न कसे करावे हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे. त्याच्या या मूलभूत अधिकारावर कोणीही सवाल उपस्थित करू शकत नाही. मात्र दुसरा प्रश्न सेलीब्रिटी म्हणून उपस्थित होतो. कोणत्याही सेलीब्रिटीला वैयक्तिक जीवन असत नाही, असा एक तर्क लढविला जाऊ शकतो. कारण ते सार्वजनिक जीवनाचा भाग मानले जातात. या मुद्द्यावर प्रदीर्घ काळापासून चर्चा सुरू असून, पुढेही होत राहील. या चर्चेला दोन पैलू असतात. सेलीब्रिटी जेव्हा आपले वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या आवडीनिवडी मीडियाला सांगत असतात, हा एक पैलू आहे. हीच मंडळी आपल्या खासगी जीवनात मीडिया ढवळाढवळ करीत असल्याची तक्रार करतात हा दुसरा पैलू आहे. या दोन पैलूंत या मुद्द्यावर चर्चा चालूच राहते. प्रीती झिंटा आणि ऊर्मिला यांच्या विवाहानंतरही हीच चर्चा पुढे कायम राहील. या चर्चेला कायद्याच्या नजरेतून पाहिले जाऊ शकत नाही. हे शक्यही नाही. सेलीब्रिटी कोणीही असो, सार्वजनिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रायव्हसीबद्दल संतुलन राखावेच लागेल. मीडियाशी संबंध कायम ठेवणे ही आणखी महत्त्वाची बाब आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाने या संबंधांवर आणखी परिणाम झाला आहे. आता कोणालाही आपले म्हणणे सांगण्यासाठी मीडियाची गरज नाही. सोशल मीडिया हा त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म असून, त्याद्वारे ते थेट लोकांशी संबंध ठेवू शकतात.प्रायव्हसी आवश्यक आहेच. ती कोणी नाकारत नाही. आपण समाजात राहतो. आपली संस्कृती, आपले संस्कार, आपल्या परंपरा पाहता लग्नासारख्या प्रसंगी आपण समाजाशी जोडले जातो. लग्नासारख्या घटना गुप्त ठेवण्यात अर्थ नाही. जेव्हा अशा बाबी गुप्त ठेवल्या जातात तेव्हा मीडियाला संबंधित कारणांचे पोस्टमार्टम करण्याची संधी मिळते. येथे चूक किंवा बरोबर हा मुद्दा नाही. प्रीती किंवा ऊर्मिलाची चूक नाही किंवा मीडियाचीही नाही. सध्या या दोघीही लग्न करून आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहेत. काही दिवसांतच या दोघीही मीडियाच्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडी-निवडीवर भाषणे देताना दिसतील. याला संतुलन म्हणावे की दुसरे काही, याबाबतचा निर्णय सोपा नाही.