काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे चाळीस हून अधिक जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यासोबत अनेक जण शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. सलमान खानच्या आगामी 'नोटबुक' चित्रपटाचे निर्मातेही शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २२ लाख रुपये देणार आहेत.
सलमान खान निर्मित 'नोटबुक' या चित्रपटाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण काश्मीरमध्ये झाले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना येथे तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी कायम आमचे संरक्षण केले. त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे आमचे चित्रीकरण पूर्ण करु शकलो. आज आपले संरक्षण करणारे हेच जवान आपल्यासाठी शहीद झाले आहेत. त्यामुळे आता आपण त्यांच्या कुटुंबीयांसाठी काही तरी करण्याची वेळ आली आहे. यासाठीच आम्ही हा मदतनिधी त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचे ठरवले आहे’, असे निर्मात्यांनी सांगितले.
'नोटबुक' या चित्रपटातून मोहनीश बहल याची मुलगी प्रनुतन आणि जहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. येत्या मार्चमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रनूतन ही अभिनेत्री नूतन यांची नात आहे. नूतन या आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. प्रनूतनच्या नावातचं नूतन असल्याने साहजिकचं तिच्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा आहेत. २५ वर्षांच्या प्रनूतनने मुंबई विद्यापीठातून बीएलएस एलएलबीची पदवी घेतली आहे़ तिला नृत्याचीही आवड आहे.