ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - मधूर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटाला असलेला विरोध काँग्रेसने याआधीच जाहीर केला आहे. मात्र आज पुण्यात एका हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरु असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केलं. गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली असल्याची माहिती मधूर भांडारकर यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने हॉटेल क्राऊन प्लाझा समोर तीव्र आंदोलन सुरू आहे.
आणखी वाचा
मधुर भंडारकर यांनी "इंदू सरकार" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज पुण्यात पत्रकार परिषदेच आयोजन केलं होत. पत्रकार परिषदे एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार एंड किचन या हॉटेलमधे दुपारी दीड वाजता ठरली होती. मात्र काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करु शकतात हे लक्षात आल्यानंतर ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यानंतर मधूर भांडारकर बावधनमधील सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधील पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्या ठिकाणीही काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार असल्याने मधूर भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला आणि ते पुणे स्टेशनजवलील क्राऊन प्लाझा या ठिकाणी पोहचले.
या हॉटेलमधे तीन वाजता पत्रकार परिषदेच आयोजन केल्याचं कळवण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते क्राऊन प्लाझा हॉटेलमधे घुसले. त्यामुले येथील पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. मधूर भांडारकर हे सध्या क्राऊन प्लाझा हॉटेलमधील त्यांच्या रुममधे आहेत. सात वाजताच्या विमानानी त्यांना मुंबईला जायचं आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्ते हॉटेलची लॉबी, पार्किंग आणि एअरपोर्टच्या प्रवेशद्वारावर बसून आहेत. होटेल क्राऊन प्लाझा आणि एअरपोर्टला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. 28 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होईल