मराठी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला खंडणी प्रकरणात नुकतेच अटक करण्यात आले आहे. अभिनेता सुभाष यादवकडून खंडणी उकळल्याप्रकणची या अभिनेत्रीला लातूरमधून अटक करण्यात करण्यात आली असल्याचे वृत्त पुणे मिररने दिले आहे. ही अभिनेत्री, तिची एक सहअभिनेत्री आणि दहशतवाद विरोधी पथकातील उपनिरीक्षकाच्या मदतीने खंडणी वसुल करत असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे.
रोहिणी माने असे या अभिनेत्रीचे नाव असून तिने पुण्यातील वानवडी पोलिस चौकीत गेल्यावर्षी सुभाष यादव विरोधात तक्रार नोंदवली होती. सुभाष यादवने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी सुभाषने अभिनेत्री सारा श्रवण, रोहिणी माने, पोलिस उपनिरीक्षक अमित टेकाळे आणि राम जगदाळे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्याने तक्रारीत म्हटले होते की, रोहिणी माने आणि त्याने रोल नंबर १८ या चित्रपटात काम केले होते. रोहिणी ही तेव्हापासून लग्न करण्यासाठी सुभाष यादवच्या मागे लागली होती. पण सुभाषने प्रतिसाद न दिल्याने रोहिणीने यादव विरोधात विनयभंगाची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुभाषचा नृत्याचा एक व्हिडिओ रोहिणीने व्हायरल केला होता. त्यावरून सुभाषने फिर्याद दाखल केली होती. तेव्हा रोहिणीने पोलीस उपनिरीक्षक टेकाळेची मदत घेतली आणि त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले हे प्रकरण मिटवण्यासाठी राम जगदाळेने सुभाष यादवला कार्यालयात बोलवून घेतले. तेथे त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना तीन तास बसवून ठेवले आणि जबरदस्तीने रोहिणी मानेचे पाय धरून माफी मागायला लावली. या गोष्टीचे चित्रीकरण करून १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी एक लाख रुपये टेकाळेने स्वीकारले. त्यानंतर उरलेली रक्कम न दिल्याने राम जगदाळे, अमोल टेकाळे आणि रोहिणी माने यांनी संगनमत करून सारा श्रवणच्या माध्यमातून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच टेकाळे याने त्याच्याजवळील पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची, अॅसिड टाकण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. साराने पिंजरा या प्रसिद्ध मालिकेत काम केले आहे तर राम जगदाळे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
या अभिनेत्रीला दहशतवाद विरोधी पथकातील उपनिरीक्षक अमोल टेकाळेने मदत केली असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँचला मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पथक रवाना झाले होते. पण तो तिथून फरार झाला होता. याच दरम्यान ही अभिनेत्री कुठे आहे याचा पत्ता पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी तिला अटक करून पुण्यात आणले आहे.