Join us

'पंजाब' आणि उडता सेन्सॉर...

By admin | Published: June 07, 2016 3:20 PM

'उडता पंजाब' या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या कट्सवरून चित्रपट रसिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - लवकरच प्रदर्शित होणा-या 'उडता पंजाब'मध्ये पंजाबमधील अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली तरूणाई व तेथील वास्तवाचे चित्रण करण्यात आले आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ८९ कट्स सुचवले असून चित्रपटाच्या शीर्षकामधून पंजाब शब्द काढून टाकण्याचीही सूचना केली आहे. तसेच राजकारण व निवडणुकीचेही संदर्भ काढण्यास सांगितले आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेमुळे चित्रपट रसिक भलतेच संतापले असून ट्विटरवरून या निर्णयाची खिल्लीही उडवली जात आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही या मुद्यावर नाराजी व्यक्त करताना, "मला नेहमी नवल वाटायचे की उत्तर कोरियामध्ये नागरिक कसे राहत असतील. पण मला आता विमान पकडायची गरज नाही. कारण इथे तेच अनुभवयास मिळत आहे," अशा संतप्त शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
         There is no film more honest than UDTA PUNJAB .. And any person or party opposing it is actually                GUILTY of promoting drugs           — Anurag Kashyap (@anuragkashyap72) June 6, 2016
सेन्सॉर बोर्डाने यापूर्वीही अशा अनेक चित्रपटांवर आक्षेप नोंदवत त्यावर कात्री चालवली आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'जेम्स बाँड' चित्रपटातील किसिंग सिन्स व शिवराळ भाषेला कात्री लावत या चित्रपटाला U/A असे सर्टिफिकेट दिले होते. सस्पेन्स थ्रिलर अशा या चित्रपटाची जान असलेली रांगडी भाषा आणि प्रणयदृष्येच कापून टाकल्याने ट्विटरकर चांगलेच निराश झाले आणि त्यांनी 'संस्कारी जेम्स बाँड' हा हॅशटॅग ट्रेन्डमध्ये आणून त्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाची चांगलीच खिल्ली उडवली होती. मात्र 'मस्तीजादे' यासारख्या अॅडल्ट कॉमेडी चित्रपटातील अनेक अश्लील दृष्ये न कापता ती तशीच दाखवण्यात आल्यानेही सेन्सॉर बोर्डावर टीकाटिप्पणी झाली होती. 
(#संस्कारी जेम्स बाँड: ट्विटरकरांनी उडवली सेन्सॉर बोर्डाची खिल्ली)
 
तसेच गेल्या वर्षी सेन्सॉर बोर्डाने  सलमान खान, अम्मा (जयललिता) व सहारा यांच्यावर विनोद नको असे सांगत एका चित्रपटातील दृश्यांवर कात्री चालवली. मात्र या मंडळींची नावे का नको यासंदर्भात सेन्सॉर बोर्डाने कोणतेही ठोस कारण दिले नव्हते. 
बॉलीवूडमधील दिग्दर्शक कुंदन शाह यांचा 'पी से पीएम तक' या चित्रपटातील दृश्ये व नावांवर बोर्डाने आक्षेप घेतला. वेश्याव्यवसायातील एक मुलगी मुख्यमंत्री व नंतर पंतप्रधानपदाची निवडणूक लढवते असे त्या चित्रपटाचे कथानक होते. या चित्रपटात सलमान खान, अम्मा व सहारा समुहाचे सुब्रतो रॉय यांच्यावर काही विनोद होते. सेन्सॉर बोर्डाने या संवादांवर कात्री लावल्याने दिग्दर्शक कुंदन शाह यांनी नाराजी दर्शवली होती. 
(सलमान, अम्मा, सहारांवर विनोद नको - सेन्सॉर बोर्ड)
  •  
तर एका गाण्यातील 'बॉम्बे' शब्दावरही आक्षेप घेत बोर्डाने हा शब्द हटवला होता. मुंबईतील संगीतकार मिहीर जोशी यांचे मुंबई ब्लू नामक पहिलावहिला अल्बम गेल्या वर्षी प्रकाशित झाला होता. हा अल्बम व्हिडीओ रुपात टीव्हीवर प्रसारीत करण्यासाठी मिहीर जोशी आणि अल्बम प्रकाशकांनी व्हिडीओची प्रत सेन्सॉर बोर्डाकडे पाठवली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने या गाण्यातील बॉम्बे या शब्दाला आक्षेप घेत या शब्दाचा भाग वगळला होता. 
 
काय होते गाण्यात ?
 
मिहीर जोशी यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी 'सॉरी' नामक एक गाणे तयार केले. या गाण्यामध्ये दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरण, मुंबईतील शक्तीमिल सामूहिक बलात्कारप्रकरण अशा विविध शहरांमधील बलात्काराच्या घटनांचा संदर्भ जोडण्यासाठी 'दिल्ली टू बॉम्बे' असा शब्द वापरला. हे गाणे वडील तिच्या मुलीसाठी गाताना दाखवण्यात आले होते. 
( गाण्यातील 'बॉम्बे' शब्दाला सेन्सॉर बोर्डाची कात्री)
 
सेन्सॉर बोर्डातही फडकावण्यात आला होता निहलानींविरुद्ध बंडाचा झेंडा 
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सेन्सॉर बोर्डातील काही सदस्यांनी बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. निहलानी यांनी एककल्ली कारभार चालवल्याबद्दल केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या (सीबीएफसी) चिंता व्यक्त केली. चित्रपटातील शब्दांना एकतर्फी कैची लावली जात असून निहलानी मंडळाला विश्वासात न घेताच निर्णय घेतात. ते दुसऱ्याचे काहीही ऐकून न घेताच स्वकेंद्रित पद्धतीने काम करतात. त्यांच्या या कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती-प्रसारणमंत्री अरुण जेटलींचे लक्ष वेधण्याचे आम्ही ठरवल्याचे असे मंडळाच्या सदस्याने स्पष्ट केले. 
 ( सेन्सॉर बोर्डात निहलानींविरुद्ध बंडाचा झेंडा)
 
  •