दिग्गजांसोबत काम करणारा हा अभिनेता आज आहे पै-पैला मोताद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 01:30 PM2019-09-08T13:30:00+5:302019-09-08T13:30:04+5:30
बॉलिवूडचे ग्लॅमरस जगात कोण कधी यशोशिखरावर जाईल आणि कधी कुणाला अपयशाला सामोरे जावे लागेल, याचा नेम नाही. ही कहाणीही अशीच.
बॉलिवूडचे ग्लॅमरस जगात कोण कधी यशोशिखरावर जाईल आणि कधी कुणाला अपयशाला सामोरे जावे लागेल, याचा नेम नाही. बॉलिवूड, टीव्ही आणि पंजाबी सिने अभिनेते सतीश कौल यांची कथाही अशीच. ही कहाणी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावतील. 8 सप्टेंबर 1954 रोजी काश्मीरमध्ये जन्मलेल्या सतीश कौल यांचा आज वाढदिवस. सतीश कौल आज अज्ञातवासात आयुष्य जगत आहेत.
सतीश कधी काळी हिंदी व पंजाबी सिनेमातील एक मोठे नाव होते. सतीश यांनी देव आनंद, दिलीप कुमार, शाहरूख खान अशा दिग्गजांसोबत काम केले. एकेकाळी पंजाबी सिनेमाचे ‘अमिताभ बच्चन’ म्हणून ते ओळखले जाते. 1974 ते 1998 याकाळात त्यांनी 300 वर चित्रपटांत काम केले. त्या काळात त्यांना न मागता काम मिळे. पण आज तसे नाही. सतीश यांच्याजवळची सगळा पैसा बिझनेसमध्ये बुडाला. एकदा त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. पण त्यांच्याकडे उपचाराचेही पैसे नव्हते. त्यांची कहाणी मीडियाने जगासमोर आणली आणि फिल्म इंडस्ट्रीतील काही लोक त्यांच्या मदतीसाठी धावले.
एकदा एका मुलाखतीत सतीश कौल यांनी सांगितले होते की, मी अॅक्टिंग स्कूल उघडले होते. पण स्कूल बंद पडले आणि माझे 22 लाख बुडाले. पटियाला युनिव्हर्सिटी आणि एस अग्रवाल यांनी काही महिने मला मदत पाठवली. पण नंतर ती सुद्धा बंद झाली. सध्या काही लोक भेटायला येतात आणि मदत करतात. त्यांच्याच मदतीच्या भवशावर मी जगतो आहे. सतीश कौल आर्थिक तंगीतून गेले, प्रकृती ढासळली. याकाळात पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांना मदत पाठवली.
65 वर्षांच्या सतीश कौल यांनी कर्मा, आंटी नंबर 1, याराना, ऐलान अशा सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. पण आज हाच अभिनेता वाढते वय, प्रकृतीच्या समस्या आणि आर्थिक तंगी यामुळे व्यथित आहे.