प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची (Sidhu Moosewala) २०२२ मध्ये हत्या झाली होती. त्याच्या हत्येनंतर सामाजिक वातावरण ढवळून निघालं होतं. सिद्धू मूसेवालाच्या आईवडिलांसंदर्भात आता एक बातमी समोर येत आहे. त्याची आई लवकरच बाळाला जन्म देणार आहे. पुढील महिन्यात त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. मूसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी बातमीला दुजोरा दिला आहे. माध्यम रिपोर्टनुसार, सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर आणि वडील बलकौर सिंह पुढील महिन्यात बाळाचं स्वागत करतील. आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा बाळाचे माता पिता होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांनीही सिद्धूच्या चाहत्यांना भेटणं टाळलं होतं. दर रविवारी ते चाहत्यांची भेट घ्यायचे. पण आता ते सार्वजनिक ठिकाणी फारसे बाहेर पडलेले दिसले नाहीत. सिद्धू हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. 29 मे 2022 रोजी त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा तो २९ वर्षांचा होता. अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्येच त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर सगळीकडेच तणावाचं वातावरण होतं. त्याच्या आईवडिलांनाही लेकाच्या हत्येनंतर जबर धक्का बसला होता. सिद्धू मूसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी सुरक्षेच्या कारणास्तव अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. या वयात हा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. तर काहींनी त्यांना ट्रोलही केले आहे. सध्या ही बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
सिद्धू मूसेवाला हा फक्त गायक नाही तर राजकारणतही सक्रीय होता. त्याच्या गायकीचे लाखो चाहते होते. २०२१ साली त्याने राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसकडून त्याने निवडणूकही लढवली मात्र त्याचा पराभव झाला. २०१९ साली त्याच्या 'जट्टी जियोने मोड दी बंदूक वारगी' या गाण्याने वाद झाला होता. यामध्ये शीख योद्धा माई भागो यांचा उल्लेख होता ज्यामुळे वातावरण तापलं होतं. यानंतर सिद्धूने याबद्दल माफीही मागितली होती.