लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बिग-बी अमिताभ बच्चन आणि त्यांचे चिरंजीव अभिनेते अभिषेक बच्चन यांनी मुंबईत गेल्या वर्षभरात मालमत्तांची दणक्यात खरेदी केली असून, त्यांच्या गुंतवणुकीने आता १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ९ ऑक्टोबर रोजी बच्चन पिता-पुत्रांनी मुलुंडमध्ये ओबेरॉय रिॲल्टीच्या एका गृहनिर्माण प्रकल्पात तब्बल १० फ्लॅट तब्बल २४ कोटी ९५ लाख रुपयांना खरेदी केले आहेत.प्राप्त माहितीनुसार, १० पैकी ६ फ्लॅटची खरेदी ही अभिषेक बच्चन यांनी केली असून उर्वरित चार फ्लॅट अमिताभ बच्चन यांनी खरेदी केले आहेत. या १० फ्लॅटचे एकूण आकारमान १० हजार २१६ चौरस फूट असून त्यासोबत त्यांना २ पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. यापैकी आठ फ्लॅटचे आकारमान सरासरी १०४९ चौरस फूट आहे, तर उर्वरित दोन फ्लॅटचे आकारमान ९१२ चौरस फूट आहे. ९ ऑक्टोबर रोजी या व्यवहाराची नोंदणी झाली असून या व्यवहाराकरिता त्यांनी एकूण दीड कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि तीन लाख रुपये नोंदणी शुल्क भरले आहे.
चार वर्षांत २०० कोटींची गुंतवणूक
२०२० ते २०२४ या चार वर्षांत अमिताभ आणि अभिषेक या दोघांनी फ्लॅट खरेदी तसेच कार्यालय खरेदीमध्ये २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. २०२४ या एका वर्षात आतापर्यंत अमिताभ यांनी एकट्यांनी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यातील सर्वाधिक किमतीची खरेदी ही ओशिवरा परिसरातील एका अलिशान व्यावसायिक इमारतीमध्ये केली आहे. तसेच अलिबाग आणि अयोध्या येथेही त्यांनी गुंतवणूक केली आहे. अभिषेक बच्चन यांनीही जून महिन्यात बोरिवली येथे त्यांनी १६ कोटी रुपयांना सहा फ्लॅटची खरेदी केली होती.