Join us

ती अँड ती या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 1:08 PM

प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणाऱ्या अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसतील.

ठळक मुद्दे‘ती अँड ती’ची कहाणी आहे, अनयची... चौथीत असताना शाळेतल्या एका मुलीवर त्याचा जीव जडतो आणि ती शाळा सोडून गेल्यावरही तो तिला कधीच विसरू शकत नाही.पण एके दिवशी जणू देव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याची ती त्याला भेटते... प्रॉब्लेम एवढाच असतो की, तेव्हा तो त्याच्या बायको बरोबर हनिमूनला गेलेला असतो.

मृणाल कुलकर्णी यांनी आजवर एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी एक अभिनेत्री प्रमाणेच एक दिग्दर्शिका म्हणून देखील आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘ती अँड ती’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नवीन विषयासह कलाकारांची युनिक निवड, सोबतीला मजेशीर डायलॉग्स, सुंदर गाणी आणि हा पूर्ण चित्रपट लंडनमध्ये शूट झाल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागणार आहे.

‘ती अँड ती’ची कहाणी आहे, अनयची... चौथीत असताना शाळेतल्या एका मुलीवर त्याचा जीव जडतो आणि ती शाळा सोडून गेल्यावरही तो तिला कधीच विसरू शकत नाही. पण एके दिवशी जणू देव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याची ती त्याला भेटते... प्रॉब्लेम एवढाच असतो की, तेव्हा तो त्याच्या बायको बरोबर हनिमूनला गेलेला असतो.

निर्माता आणि मुख्य भूमिका अशा दोन्ही जबाबदाऱ्या पुष्कर जोगनी यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे या दोघी या चित्रपटात नायिका असून सिद्धार्थ चांदेकर एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाच्या टीमने नुकत्याच पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, कलाकार पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, सिद्धार्थ चांदेकर, निर्माते वैशाल शाह, मोहन नादर, लेखक विराजस कुलकर्णी उपस्थित होते. तसेच त्यांच्या सोबतीला संगीतकार साई-पियुष, गायक अवधूत गुप्ते आणि गायिका महालक्ष्मी अय्यर यांची देखील उपस्थिती होती.

प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणाऱ्या अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसतील. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे इंग्लंड मध्ये झालेले आहे आणि या चित्रपटाची कथा-पटकथा विराजस कुलकर्णीने लिहिली आहे तसेच संवाद मर्मबंधा आणि विराजस कुलकर्णी यांचे आहेत.

चित्रपटाला संगीत साई-पियुष यांनी दिले आहे आणि चित्रपटातील धमाल गाण्यांना आवाज अवधूत गुप्ते, महालक्ष्मी अय्यर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, गौरव बुरसे आणि अर्पिता चक्रवर्ती यांनी दिला आहे. छायाचित्रणाची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांनी सांभाळली आहे तर अर्जुन मोगरे यांनी संकलन केले आहे. हा चित्रपट ८ मार्च २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :पुष्कर जोगसोनाली कुलकर्णीप्रार्थना बेहरेमृणाल कुलकर्णी