साऊथ सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने 'पुष्पा' चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि डॅशिंग ॲक्शनने लोकांची मने जिंकली. पण त्याच्या आधी हा चित्रपट बॉलिवूडचा एक सुपरस्टार करणार होता. होय, हे खरंय हा चित्रपट बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानला ऑफर करण्यात आला होता. मात्र अभिनेत्याने हा चित्रपट नाकारला.
२०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटातून अल्लू अर्जुनला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अल्लूने आपली व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच आजही अभिनेत्याची ही भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि ते 'पुष्पा २' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरेतर, 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुन नाही तर बॉलिवूडचा किंग ऑफ रोमान्स म्हणजेच शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार होता. याचा खुलासा खुद्द शाहरुख खानने IIFA २०२४ च्या मंचावर केला होता.
सिनेमा नाकारण्याचे कारण आले समोर
विक्की कौशलने शाहरुखला विचारले की, 'पुष्पा' सिनेमाची अल्लू अर्जुनच्या आधी तुला ऑफर आली होती का? तर तो म्हणाला, 'अरे यार, जखमेवर मीठ चोळू नकोस. मला खरंच पुष्पा करायचा होता.' शाहरुख खानने चित्रपट नाकारण्याचे कारणदेखील सांगितले. तो अल्लू अर्जुनच्या स्वॅगशी जुळवून घेऊ शकत नव्हता. त्यामुळेच त्याने हा चित्रपट केला नाही, असे किंग खानने सांगितले.
'पुष्पा'बद्दल
रश्मिका मंदाना 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुनसोबत दिसली होती. या दोघांनी मोठ्या पडद्यावर खळबळ माजवली आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. वृत्तानुसार, १८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३६०-३७३ कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केले होते. लवकरच या चित्रपटाचा भाग २ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट यावर्षी ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे.