काही दिवसांपासून संपूर्ण सोशल मीडिया, तरुणाईमध्ये घंटा या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे; पण प्रत्येकाला एकच प्रश्न पडला आहे. या चित्रपटाचे नाव घंटा का ठेवले? प्रेक्षकांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश काळे म्हणाला, की खूप विचार करूनही या चित्रपटाला नावच मिळत नव्हते. यासाठी आमच्या टीमने बरीच चर्चादेखील केली; पण काहीच हाती लागत नव्हते. सहज बोलताना एकाच्या तोंडून ‘घंटा’ हा शब्द बाहेर पडला, त्या वेळी हा शब्द खूप मनोरंजक वाटला. तसेच, आजच्या तरुणाईमध्ये हा शब्ददेखील खूपच कॉमन आहे. त्यामुळे घंटा हे नाव चित्रपटाला देण्यात आले. तसेच, या चित्रपटात घंटा या शब्दाचा अर्थ वल्गर पद्धतीने बिलकूल घेण्यात आलेला नाही, तर ज्या वेळी खूप प्रयत्न करूनही हाती काहीच लागत नाही, त्या वेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी घंटा हा शब्द वापरण्यात आला आहे. तरुणांना नक्कीच प्रेरणा देणारा हा चित्रपट असेल. त्यासाठी प्रेक्षकांना १४ आॅक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटात तरुणांचे लाडके कलाकार अमेय वाघ, आरोह वेलणकर, सक्षम कुलकर्णी यांचा समावेश आहे. या तिघांची मनोरंजक कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.
चित्रपटाचे नाव ‘घंटा’ का ठेवले ?
By admin | Published: October 10, 2016 3:00 AM