Join us  

सनी लिओनीचा आदर्श ठेवा, महिलादिनी रामूचा अजब सल्ला

By admin | Published: March 08, 2017 1:58 PM

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक राम गोपाल वर्माने महिलांना सनी लिओनीचा आदर्श बाळगत तिच्याप्रमाणे पुरूषांना आनंद देण्याचा सल्ला दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - ' स्त्रीत्वा'च्या उत्सवानिमित्त आज , ८ मार्च रोजी जगभर महिला दिन साजरा होत आहे. 'गूगल'नेही डूडलच्या माध्यमातून 'स्त्री' शक्तीला सलाम केला तर क्रिकेटपटू विराट कोहलीसह अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ' महिला दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र सतत वादग्रस्त टिप्पणी करत चर्चेत राहणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने  'महिला दिना'निमित्त वादग्रस्त ट्विटची परंपरा कायम ठेवली आहे. 'हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीचा आदर्श समोर ठेवा आणि पुरूषांना  आनंद द्या' असा अजब सल्ला रामूने महिलांना दिला आहे. एवढेच नव्हे तर ' महिला दिनाला पुरूष दिन म्हणावे कारण महिलांपेक्षा पुरूषच हा दिवस जास्त साजरा करतात' असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 
यापूर्वीही रामूने अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली होती. काही वर्षांपूर्वी रामूने गणराया'बद्दल विवादास्पद ट्विट केले होते. 'जो देव स्वत:चे शीर वाचवू शकला नाही तो इतरांचे रक्षण कसे करेल? हे मला कोणी सांगेल का' असे ट्विट वर्मा यांनी केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे असाही प्रश्न विचारला की, ' आजच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता की त्याचे शीर उडवण्यात आले होते?' 'गणपती आपल्या हाताने जेवतो की सोंडेने?' असे अनेक वादग्रस्त प्रश्न त्यांनी ट्विटरवर विचारले.
 
तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांच्यावरही रामूने टीकास्त्र सोडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 'सर्जिकल स्ट्राईक'चा पुरावा मागणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिग्दर्शक-निर्माता राम गोपाल वर्माने खिल्ली उडवली होती.  'मफलर आणि टोपी घालून केजरीवाल एखाद्या माकडाप्रमाणे दिसतात, असे मला वाटायचे, मात्र लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यावरुन ते खरोखरच माकड असल्याचे सिद्ध झाले आहे', अशी उपहासात्मक टीका रामूने केली होती.  तसंच 'केजरीवाल हनुमान आणि सुग्रीवच्या जातीपलीकडे जाऊन आता शरीफ-मुशर्रफ यांच्या जातीत पोहोचले आहेत, हे  त्यांनी लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हावरुन सिद्ध झाले आहे', असे देखील ते म्हणाले होते. 
 
तर मिसेल ओबामा यांच्याविरोधातही त्यांनी वर्णद्वेषी टिपण्णी केली. रामूने नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी व अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांची तुलना करताना एक ट्विट केले, ज्यामुळे त्याच्यावर वर्णद्वेषाचा आरोप लावण्यात आला होता.  ' काही कारणामुळे मला आधीच्या फर्स्ट लेडीपेक्षा (मिशेल ओबामा) सध्याची फर्स्ट लेडी ( मेलेनिया ट्रम्प) जास्त आवडते. असे का हे कोणी सांगू शकेल का?' असा सवाल विचारत त्यांनी एक स्माईली आणि त्या मेलेनिया- मिशेला या दोघींचा फोटोही पोस्ट केला होता.