Join us

‘लालबागची राणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 2:06 AM

जगायची कारणे क्षणभर विसरून आयुष्याकडे मजेने बघायला हवे. सतत अपेक्षांचे, स्वप्नांचे, ध्येयाचे ओझे घेऊन ताणतणावात जगण्यापेक्षा मनाजोगते, निरागसपणे जगायला हवे

जगायची कारणे क्षणभर विसरून आयुष्याकडे मजेने बघायला हवे. सतत अपेक्षांचे, स्वप्नांचे, ध्येयाचे ओझे घेऊन ताणतणावात जगण्यापेक्षा मनाजोगते, निरागसपणे जगायला हवे. हा निरागसपणा चित्रपटाच्या कथा, संवाद, सादरीकरण साऱ्यातूनच अलगद सांगणारा ‘लालबागची राणी’ प्रेक्षकांना नक्की आवडेल. स्पेशल चाइल्ड असणाऱ्या संध्या या मुलीची भूमिका वीणा साकारते आहे. ही संध्या एक दिवस रस्ता चुकते. २४ तास ती मुंबईत फिरत असते. या २४ तासांत तिला तिच्या निरागस नजरेने जी मुंबई दिसते, ती अप्रतिम आहे. ती आजवर कुणी बघितली नसेल, असे वाटते. या २४ तासांत आपली मुलगी हरवली आहे, या भावनेनेच कुटुंबीयांची पाचावर धारण बसते. मुलगी सापडेपर्यंत घरच्यांच्या मनाची होणारी घालमेल या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईमध्ये झाले असून, संध्याच्या नजरेतील निरागसता सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र अशा सर्व वेळांमधील मुंबई, तिचे चित्र हिच्याशी जोडण्यात आले आहे. या चित्रपटात अ‍ॅँडीची भूमिका साकारणारा प्रथमेश परब याने चित्रपटात स्वत:चाच माज असणाऱ्या स्ट्रगलर अ‍ॅक्टरची भूमिका साकारलेय. नेहा जोशी, अशोक शिंदे आदी कलाकारांच्या चमूने या चित्रपटात अभिनयाची आतशबाजी केली असून, नाचगाणी, मनोरंजन, सुख-दु:खे या साऱ्यांनी ठासून भरलेला हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणारा ठरेल. चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर व सुनील मनचंदा यांनी केली असून, रोहन घुगे यांची कथा आहे.