‘संजू’ हा अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट उद्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. संजय दत्तचे आयुष्य आणि या आयुष्यातील घटनाक्रम कुणापासूनही लपून राहिलेले नाहीत. आता हीच कहाणी चित्रपटरूपात मोठ्या पडद्यावर येतेय. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारतोयं.काल या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. या स्पेशल स्क्रिनिंगनंतर ‘संजू’ सुपरडुपर हिट मानला जात आहे. आमचेही मत यापेक्षा वेगळे नाही.
सिनेमा सुरु होताच तो उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतो. सुरुवातीचे पाच मिनिटं तर संजय दत्त आणि रणबीर कपूर हे दोन्ही वेगळे आहेत, हे कळतही नाही, इतका रणबीर संजयच्या भूमिकेशी एकरूप झालेला दिसतो. चित्रपट सुरू होतो, तसाच खिळवून ठेवण्यास सुरूवात करतो. रणबीरचा अभिनय मनाला भिडतो. केवळ रणबीरचं नाही तर संजयच्या मित्राच्या भूमिकेतील विकी कौशल, संजयच्या आईच्या भूमिकेतील मनीषा कोईराला, सुनीत दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल इथपासून तर अनुष्का शर्मा, दिया मिर्झा असे सगळेच आपआपल्या भूमिकेत जीव ओततात. ‘संजू’मधील प्रत्येक पात्राने आपल्या वाट्याला आलेल्या छोट्यात छोट्या भूमिकेलाही न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे ‘संजू’ अधिक उठून येतो. अर्थात रणबीर कपूर सर्वांवर भारी पडतो. त्याच्या अभिनयाला तोड नाही, असेच म्हणता येईल. चित्रपटाचे संगीत कथेला पुढे नेण्यास मदत करते आणि रणबीरचा जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो. तूर्तास या चित्रपटाला आम्ही साडे चार स्टार देतो.