साऊथचा सुपरस्टार असलेल्या आर.माधवनने हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. माधवनचा आज म्हणजेच 1 जूनला वाढदिवस असून त्याचा जन्म बिहारमधील जमशेदपूरमध्ये झाला. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या माधवनने एका जाहिरातीत काम केले होते. या जाहिरातीमुळेच तो या क्षेत्राकडे वळला.
आर. माधवन साऊथच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये खूपच कमी चित्रपट करत असला तरी बॉलिवूडमध्ये देखील त्याला खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. त्याचे लूक्स, त्याची स्माईल यावर तरुणी फिदा आहेत. त्याने बनेगी अपनी बात या मालिकेद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील त्याची भूमिका प्रचंड हिट झाली होती. त्यानंतर तो आपल्याला घर जमाई, साया यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसला.
रहना है तेरे दिल मे या पहिल्याच हिंदी चित्रपटामुळे तो तरुणींच्या दिल की धडकन बनला. या चित्रपटातील मॅडी प्रेक्षकांना प्रचंड भावला. या चित्रपटातील त्याच्या रोमँटिक अंदाजाचे तर सगळेच दिवाने झाले होते.
माधवनने या चित्रपटानंतर गुरू, रंग दे बसंती, थ्री इडियट्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. या चित्रपटांमधील त्याचे लूक्स, त्याचा अभिनय यामुळे त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये प्रचंड वाढ झाली. तनू वेड्स मनू या चित्रपटातील त्याने साकारलेला मनू पाहाता आपल्या आयुष्यात देखील अशीच व्यक्ती असली पाहिजे असे तरुणींना वाटायला लागले. माधवनच्या आतापर्यंतच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप चांगले प्रेम मिळाले आहे. त्यामुळे तो चित्रपटांची निवड चोखंदळपणे करतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
माधवन हा सोशल मीडियावर देखील चांगलाच अॅक्टिव्ह असतो. तो सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो. पण त्याचसोबत तो सोशल मीडियाद्वारे अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतो. त्यामुळेच त्याला अनेकजण सोशल मीडियावर फॉलो करतात. तो पेटाचा सदस्य असून प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी तो नेहमीच पुढाकार घेतो. शिक्षण, पर्यावरण याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये तो हिरीरीने सहभागी होतो.