बॉलिवूडमधील ‘जानी’ अर्थात अभिनेते राजकुमार यांची आज पुण्यतिथी. 3 जुलै 1996 रोजी घशाच्या कॅन्सरमुळे मुंबईत त्यांचे निधन झाले होते. आज राजकुमार आपल्यात नाहीत, मात्र पडद्यावरचा त्यांचा दमदार आवाज, त्यांचे अनोखी अॅक्टिंग स्टाइल आणि डायलॉग आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. ‘जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते...’ हा राजकुमार यांचा डायलॉग आजही प्रसिध्द आहे. ‘पाकिजा’मधील ‘आपके पांव देखे...बहुत हसीन हैं, इन्हें जमीन पर मत उतारिएगा... मैले हो जाएंगे...’ हा डायलॉग तर आजही सिनेप्रेमी विसरलेले नाहीत.
राजकुमार हिरो बनण्याआधी मुंबईच्या माहिम पोलिस ठाण्यात इन्स्पेक्टर होते, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. पण इन्स्पेक्टर असतानाही त्यांचा हटके अंदाज पाहून अनेकजण त्यांच्या प्रेमात पडत. एकदा त्यांच्या हाताखाली काम करणारा एक पोलिस शिपाई ‘सर, तुम्ही अगदी चित्रपटातील हिरो शोभता,’ असे राजकुमार यांना म्हणाला होता. त्या शिपायाचे ते वाक्य राजकुमार यांच्या डोक्यात भिनले होते. याचदरम्यान एकदा चित्रपट निर्माते बलदेव दुबे काही कामानिमित्त पोलिस ठाण्यात आलेत. राजकुमार यांच्याशी त्यांची भेट झाली. राजकुमार यांच्या संवादशैलीने ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी लगेच राजकुमार यांना आपल्या ‘शाही बाजार’ या चित्रपटाची ऑफर दिली. राजकुमार यांनीही ती लगेच स्वीकारली. पुढे उपनिरीक्षकपदाचा राजीनामा देऊन राजकुमार चित्रपटसृष्टीत आलेत.
राजकुमार यांना घशाचा कॅन्सर होता. राजकुमार यांच्या ज्या दमदार आवाजाने प्रेक्षकांना रिझवले, तोच आवाज या आजाराने हिरावून घेतला होता. अखेरच्या दिवसांत तर राजकुमार यांचा आवाज इतका क्षीण झाला होता की, त्यांच्या कुटुंबीयांना अगदी त्यांच्या जवळ जावून त्यांचे बोलणे ऐकावे लागे. राजकुमार यांना याचे दु:ख होते. पण हे दु:ख ते जगापुढे दाखवू इच्छित नव्हते. याबद्दल कुणालाही कळू नये, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा मुलगा पुरू याला त्यांनी तसे सांगितले होते. राजकुमार यांना कॅन्सर असल्साच्या बातम्या मीडियात झळकल्या, तेव्हा राजकुमार यांनी इन्कार केला होता. हे सगळे बकवास आहे, मी एकदम ठीक आहे, असे त्यांनी ठासून सांगितले होते. पण प्रत्यक्षात कॅन्सरने त्यांना विळखा घातला होता. अखेरच्या क्षणी राजकुमार यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला जवळ बोलवले आणि आपली अंतिम इच्छा बोलून दाखवली. ‘ही कदाचित माझी अखेरची रात्र असेल. मृत्यूने मला गाठलेच तर सगळे अंत्यविधी आटोपून घरी परतल्यानंतर माझ्या मृत्यूची बातमी सगळ्यांना द्या. कारण मला माझ्या मृत्यूचा तमाशा बनवायचा नाही,’ असे ते म्हणाले होते.राजकुमार यांना आपल्या मृत्यूचा तमाशा नको होता, यामागे एक ठोस कारण होते. होय, एका चित्रपटात राजकुमार एक डेथ सीन शूट करत होते. तो डेथ सीन शूट केल्यानंतर मी माझ्या मृत्यूचा असा तमाशा बनवणार नाही, हे त्यांनी ठरवून टाकले होते. शेवटी त्यांनी तेच केले.
3 जुलै 1996 रोजी राजकुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. केवळ 69 व्या वयात एक रूबाबदार अभिनेता आपल्याला सोडून गेला.