राधिका आपटे ही बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री. विविधांगी भूमिका करणारी आणि अभिनयाचे अनेक प्रकार चोखंदळपणे सादर करणारी अभिनेत्री म्हणून तिचा नेहमीच गौरव केला जातो आहे. आता ती २४ आॅगस्टपासून सुरू झालेल्या ‘घुल’ या एका दमदार नेटफ्लिक्स सीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही एक हॉरर वेबसीरिज असून ती तीन भागांत रिलीज झाली आहे. यात राधिका सोबत अभिनेता मानव कौल हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. राधिका व मानव एका केसच्या चौकशीदरम्यान एका माणसाला भेटतात आणि यानंतर सुरू होतो थरकाप उडवणारा खेळ. याच निमित्ताने राधिका आपटे हिने लोकमत आॅफिसला भेट दिली. तेव्हा तिच्याशी साधलेला हा संवाद... * ‘घुल’चा नेमका अर्थ काय?- घुल हा एक अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ वाईट शक्तींशी निगडित आहे. आत्तापर्यंत हॉरर या प्रकारांत वेगवेगळे प्रयोग झाले. हा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आम्ही केलेला अनोखा प्रयोग आहे. प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल, याची खात्री आहे. पॅट्रिक ग्रॅहम यांनी ही नेटफ्लिक्स दिग्दर्शित केली आहे. ही एक मिनिसीरिज असून प्रेक्षकांच्या मनाची उत्सुकता वाढवून जाणार, असे वाटते आहे.
* ‘घुल’ या नेटफ्लिक्सविषयी तू किती उत्सुक आहेस?- नक्कीच मी खूप उत्सुक आहे. हा एक नवीन प्रयोग आहे. मी निदा रहिम या व्यक्तिरेखेत दिसत असून माझ्यासोबत मानव कौल हा देखील दिसत आहे. आम्ही केसच्या दरम्यान एका हॉरर मोमेंटसोबत जोडले जातो. त्याचा इतिहास, त्याचा प्रवास, हॉरर घटनांची मालिका हे सगळंच प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारं आहे.
* इतक्या वर्षांपासून तू बॉलिवूडमध्ये आहेस. तुझ्या आॅफर्स आणि फॅन फॉलोर्इंगमध्ये काही फरक पडलाय का?- काही प्रमाणात फरक पडलाय. मला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काम करायला आवडतं. वेगवेगळया प्रकारच्या अभिनयाची द्वारे उघडायला आवडतात. नेटफ्लिक्स हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. यांचे प्रेक्षक खूप आहेत. नक्कीच, फॅन्सच्या संख्येत बराच फरक पडला आहे. चाहत्यांचे प्रेम कायम मला प्रेरणा देते. त्यामुळेच मी विविधरूपी कार्य करू शकते.
* तुझ्या आयुष्यातील हॉरर मोमेंट शेअर करशील का?- खरंतर, असा कुठला क्षण नाही. पण, मी लहान असताना माझ्या खोलीत एक कपाट होते. त्या कपाटावर मी माझी आवडती खेळणी काढण्यासाठी धडपड करू लागले तेव्हा माझा पाय सटकला अन् मी धपकन पडले तेव्हा माझ्या अंगावर काहीतरी पडल्याचा मला भास झाला. तेव्हा मी लहान असल्याने लवकर घाबरले. तेव्हा ती मोमेंट माझ्यासाठी हॉरर मोमेंट होती.
* या नेटफ्लिक्सच्या माध्यमातून तू प्रेक्षकांना कोणता संदेश देऊ इच्छितेस?- अभिनयाचे वेगवेगळे प्रकार प्रेक्षकांनी पाहिले पाहिजेत. त्यात हॉरर हा प्रकार अनेकांचा आवडता प्रकार असू शकतो. या नेटफ्लिक्सच्या माध्यमातून नक्कीच त्यांना उत्कृष्ट कलाकृती पाहिल्याचे समाधान मिळेल.