मुंबई - राधिका आपटे आपल्या हटके भूमिकांसाठी आणि नाविण्यपूर्ण चित्रपटांमुळे, वेब सिरीजमुळे सिनेसृष्टीत वेगळं स्थान टिकवून आहे. यापूर्वीच्या तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. प्रसंगी बोल्ड सीनमुळेही ती चांगलीच चर्चेत आली होती. आता, 'मेड इन हेवन' ह्या वेब सिरीजच्या माध्यमातून राधिका आपटे चाहत्यांच्या भेटीला आली आहे. या वेब सिरीजचा हा दुसरा भाग १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून चाहत्यांची, प्रेक्षकांची तिच्या भूमिकेला दाद मिळत आहे. या वेब सिरीजमध्ये तिने दलित मुलीची भूमिका केली असून प्रकाश आंबडेकर यांनीही या पात्राचे कौतुक केलंय.
मेड इन हेवनच्या दुसऱ्या भागातील ५ व्या एपिसोडमध्ये राधिका आपटे दलित मुलीच्या भूमिकेत दिसून येते. त्यात, पल्लवीच्या लग्नाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. पल्लवी एका उच्चवर्गीय हिंदू मुलासोबत लग्न करते. मात्र, दलित रितीरिवाजाप्रमाणेही तिने लग्न केल्याचं वेबसिरीजमध्ये दिसून येतं. विशेष म्हणजे पल्लवीचा अभिनय आणि पात्राची आक्रमक शैली पाहून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वेब सिरीज आणि पल्लवीचं कौतुक केलंय.
'मला दलित स्त्री पात्र पल्लवीची जिद्द, अवहेलना आणि प्रतिकार आवडला. ज्या वंचित आणि बहुजनांनी ही सिरीज पाहिली, त्यांनी स्वतःची ओळख आणि व्यक्तिमत्त्वावर दृढनिश्चयी राहिलं पाहिजे. तुम्ही दृढनिश्चयी राहिले तरच तुम्हाला राजकीय महत्त्व प्राप्त होईल.', असे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटसोबत आंबेडकरांनी वेब सिरीजमधील एका सीनचा फोटोही शेअर केला आहे.