अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. दरम्यान महिला दिनाचे निमित्त साधून राधिकाच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'मिसेस अंडरकव्हर'. यात ती स्पाय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. B4U मोशन पिक्चर्सने जादुगरच्या फिल्म्स आणि नाइट स्काय मूव्हीजच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन अनुश्री मेहताने केले आहे. ही डायरेक्ट-टू-डिजिटल फिल्म असून यात सुमीत व्यास राजेश शर्मा आणि साहेब चटर्जी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत आणि या वर्षा अखेरीस मिसेस अंडरकव्हर झी ५ वर रिलीज होणार आहे
मिसेस अंडरकव्हर ही एका साध्या भारतीय गृहिणीची धमाल, आजच्या काळाची, ॲक्शन-पॅक्ड आणि मनोरंजक कथा आहे. ही एक स्पेशल अंडरकव्हर आहे आणि तिला 10 वर्षांनी विशेष कामासाठी पाचारण करण्यात आले आहे. पण या 10 वर्षांत ती अंडरकव्हर एजंटचे सर्व पैलू विसरून गेली आहे. कारण तिने तिचा सगळा वेळ एक आदर्श गृहिणी होण्यासाठी दिला आहे. ती तिच्या सासू-सासऱ्यांची, मुलाची आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रतिनिधी असलेल्या पतीची सेवा करत आहे.
राधिका आपटे या चित्रपटातील मुख्य भूमिकेत आहेच, त्याचप्रमाणे ती यापूर्वी कधीही न पाहिलेल्या गृहिणी व अंडरकव्हर एजंट अशा दोन्ही अवतारांमध्ये दिसणार आहे. ही तारेवरची कसरत करताना तिला अनेक नराधमांशी आणि पुरुषप्रधान समजांशी चार हात करावे लागतात. या चित्रपटाच्या शेवटी हाच संदेश दिला आहे की, गृहिणी खऱ्या अर्थाने सुपरवूमन असते आणि ती फक्त गृहिणी कधीच नसते. एका स्त्रीने अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी हाताळणाऱ्या, बहुगुणी महिलेविषयी एका महिलेने लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या आणि राधिका आपटेसारख्या अष्टपैलू अभिनेत्रीची प्रमुख भूमिक असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी जागतिक महिला दिनाहून अधिक चांगला दिवस असूच शकला नसता. या चित्रपटात सुमीत व्यास खलनायकी भूमिकेत आहे तर राजेश शर्मा स्पेशल फोर्सच्या प्रमुखाच्या भूमिकेत आहे जो दुर्गाची (राधिका आपटे) नियुक्ती करतो.