राधिका मदनने मेरी आशिकी तुम से ही या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने फटाका, मर्द को दर्द नही होता यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती अंग्रेजी मीडियम या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्या या चित्रपटाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...
हिंदी मीडियम हा चित्रपट तू पाहिला होतास का? या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?मी इरफान खान यांची खूप मोठी चाहती आहे. त्यांचे सगळेच चित्रपट मी आवर्जून पाहाते. हिंदी मीडियम हा त्यांचा चित्रपट तर मला प्रचंड आवडला होता. या चित्रपटाचा सिक्वल येतोय हे मला कळल्यानंतर मी या चित्रपटातील त्यांच्या मुलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. ऑडिशनमध्ये माझी निवड झाल्यानंतर मी प्रचंड खूश झाले होते.
इरफान खान आणि करिना कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी या चित्रपटाच्या पटकथेच्या रिडिंगच्या निमित्ताने मी इरफान खान यांना सगळ्याच पहिल्यांदा भेटले होते. त्यांना मी पहिल्याच भेटीत हॅलो पप्पा अशी हाक मारली होती. तेव्हा त्यांनी लगेचच या चित्रपटात तू माझ्या मुलीच्या भूमिकेत आहेस का असे मला विचारले होते. तेव्हापासूनच आमच्या दोघांचे ट्युनिंग खूपच चांगले जमून आले होते. करिना कपूर आणि इरफान खान हे दोघेही खूपच चांगले कलाकार असून त्यांना अभिनय करताना पाहाणे ही पर्वणीच आहे. त्या दोघांनाही कधीच ओढूनताणून अभिनय करावा लागत नाही. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.
तुझ्या कुटुंबियातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नसताना तू या इंडस्ट्रीत कशी आलीस?माझ्या कुटुंबियातील कोणीच या इंडस्ट्रीशी संबंधित नसल्याने मी अभिनेत्री बनेन असा मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. माझे काही फोटो फेसबुकला पाहिल्यानंतर मला माझ्या पहिल्या मालिकेची ऑफर मिळाली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने मी मुंबईत आले आणि काहीच काळात मला खूप चांगल्या भूमिका मिळाल्या. आज मला मिळालेल्या यशामुळे माझ्या कुटुंबियातील मंडळी प्रचंड खूश आहेत.
मालिकेत आणि चित्रपटात काम करताना तुला काय फरक जाणवला?चित्रपटात काम करणे आणि मालिकेत काम करणे यात जमीन आस्मानचा फरक आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. चित्रपटाचे चित्रीकरण करताना एखाद्या दृश्याचे चित्रीकरण तुम्ही दोन-तीन दिवस देखील करू शकता. एखादे दृश्य जोपर्यंत मनाला पाहिजे तसे होत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिटेक घ्यायला मिळतात. पण त्याच तुलनेत मालिकेचे चित्रीकरण करताना कधीकधी दिवसाला एक-दोन भाग देखील चित्रीत करावे लागतात. तिथे तुमच्याकडे वेळच नसतो. तसेच मालिकेचे चित्रीकरण कित्येक तास सुरू असते. त्यामुळे तुम्हाला काही वेळा तुमच्या तब्येतीकडे देखील लक्ष दयायला वेळ मिळत नाही.