Join us

सुपर मॉडेलच्या खलनायकी भूमिकेने नायकही हादरले; आता बनला तडफदार IPS अधिकारी, Exclusive Interview

By मयुरी वाशिंबे | Updated: February 14, 2025 13:09 IST

नव्या भुमिकेतून राहुल देवनं केली वर्ष २०२५ ची शानदार सुरूवात, 'लोकमत फिल्मी'सोबत साधला खास संवाद

>>मयुरी वाशिंबे

राहुल देव सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहे. राहुल देवने (Rahul Dev) हिंदीव्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, मराठी, भोजपुरी, बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे. बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. आपल्या भूमिकांमुळे राहुल नेहमीच चर्चेत राहिला. अलिकडेच त्याची थ्रिलर वेब-सिरीज 'गृह लक्ष्मी' (Griha Lakshmi) प्रदर्शित झाली आहे.  "गृह लक्ष्मी" सोबत राहुलनं नव वर्ष  २०२५ची शानदार सुरूवात केली आहे. या सीरिजमध्ये त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भुमिका साकारली आहे. या सीरिजचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. यानिमित्त राहुल देवने 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधला. 

गृह लक्ष्मी सीरिजसाठी काय मेहनत घ्यावी लागली? 

'गृह लक्ष्मी'मध्ये मी एका गुन्हेगारी विरोधात लढणाऱ्या प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्याची भुमिका साकारली आहे. मी मुळचा पंजाबी आहे. पण, सीरिजमध्ये साकारलेलं पोलिस अधिकाऱ्याचं पात्र हरियाणवी आहे. त्यामुळे ही "टोकस" नावाची भुमिका साकारण्यासाठी मी हरियाणवी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. हरियाणवी भाषेचा लेहजा शिकण्यासाठी मेहनत घेतली. 

गृह लक्ष्मी हे नाव ऐकल्यावर मनात एक वेगळी प्रतिमा तयार होते. ही सीरिज नेमकं काय दाखवते?

'गृह लक्ष्मी' हे सीरिजचं नाव असलं तरी सीरिज तशी बिलकूल नाही. 'लक्ष्मी' हे एक पात्र आहे. जे हिना खान हिनं साकारलेलं आहे. मी साकारलेला पोलिस अधिकारी एका 'लक्ष्मी' ला भेटतो आणि तिची मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण, पुढे सीरिज वेगळं वळणं घेते.  स्टोरी एवढी रिअल नाही. त्यात थोडा सिनेमॅटिक तडका आहे. जसं सैफच्या घरी हल्ला झाला आणि पोलिसांनी ताबडतोब आरोपीला शोधून काढलं. पण, स्क्रीनप्लेमध्ये स्टोरी लांबवली जाते. जर एकमदच रिअल लाईफ दाखवलं तर लोकांना स्टोरीत इन्स्टरेस्ट येत नाही. प्रेक्षकांना थोडं मनोरंजनात्मक हवं असतं. प्रेक्षकांना महिलेच्या रुपात असा हिरो हवा आहे, जसं ते खऱ्या आयुष्यात बनू शकतं नाहीत. मुंबई हे महिलांसाठी सेफ आहे. पण, उत्तर प्रदेश किंवा तिकडच्या भागात तसं नाही. तेव्हा छेड काढऱ्या व्यक्तींच्या कानाखाली देऊ असं तिथल्या मुलींच्या मनात येत असेल. पण, खऱ्या आयुष्यात ती मारू शकत नाही. कारण, मग प्रकरण वाढत जाण्याची भीती असते. 

वडील पोलिस अधिकारी होते, त्यांच्यासारखं आपणही व्हावं हे स्पप्न कधी पाहिलं होतं का?

माझे बाबा माझे हिरो होते. पण, पोलिस अधिकारी होण्याचं माझं स्वप्न नव्हतं. त्यांचं आयुष्य मी फार जवळून पाहिलं आहे. कठीण आयुष्य होतं त्यांचं. मध्यमवर्गीय आमचं कुटुंब होतं. माझी आईदेखील नोकरी करायची. जर एखादा प्रामाणिक पोलिस अधिकारी असेल तर त्याचा पगार हा घरासाठी आणि मुलांना शिक्षण देण्यात खर्च होतो. मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षणाला म्हत्व दिलं जातं. तसंच आमच्याही घरी होतं. आम्हाला चांगलं शिक्षण मिळालंय. मी इंजीनियरिंग पुर्ण केलं. इंजीनियरिंग झाल्यावर मी तीन महिने नोकरीदेखील केली. पण, त्यादरम्यान मला रेमंड ब्रँडसाठी मॉडेलिंगची संधी मिळाली आणि मी मग या क्षेत्रात आलो.

खरं तर चॅम्पियनच्या आधी मला मुकुल आनंद यांनी मला त्यांच्या 'दस' या सिनेमात खलनायक म्हणून घेतलं होतं. त्याकाळी मोठे होर्डिंग्स लागायचे. आता तेवढे लागत नाही. रेमेंडसाठी केलेल्या मॉडेलिंगचे माझे मोठे-मोठे होर्डिंग्स लागायचे. त्या होर्डिंग्समधूनच मुकुल आनंद यांना माझ्याबद्दल कळालं होतं.  'दस' या सिनेमात सलमान खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, रवीना टंडन अशी स्टारकास्ट होती. यासाठी अमिरेकेत ४२ दिवसांच शुटिंगही झालं होतं. पण, अमेरिकावरुन परतल्यानंतर दुर्देवाने त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, मग तो सिनेमा खोळंबला. मी दोन वर्ष वाट पाहिली. त्यानंतर मग मला 'चॅम्पियन' सिनेमा मिळाला. 

आज फिल्म इंडस्ट्रीतील संपुर्ण प्रवास मागे वळून पाहिल्यावर काय वाटतं?

अनुपम खेर यांनी ६६० चित्रपट केले आहेत. आमिताभ बच्चन झाले, असे अनेक  मोठे लोक आहेत, ज्यांनी प्रचंड काम केलं आहे. त्यामुळे जर मागे वळून पाहतं बसलं तर पुढे काम कसं करणार. आता एक गोष्ट चांगली आहे की आता मला फक्त खलनायकाचे पात्र मिळत नाही. जेव्हा मी दस सिनेमासाठी काम करत होते. तेव्हा त्यांनी मला अभिनय शिकण्यासाठी क्लास लावला होता. तेव्हा मी काम करतो होते. मी एनएसडीमध्ये जाऊन मी अभिनय शिकलो नाही. आतापर्यंत १५३ ते १५४ चित्रपट मी केलेत, हा जो प्रवास राहिलाय, यातूनच मी शिकत गेलो. एस.एस. राजामौली यांच्यासोबत Simhadri हा चित्रपट केला होता, असे २९ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबत मी काम केलंय.  मुकुल आनंद यांच्यासोबत सुरुवात केली होती, तेच राष्ट्रीय विजेते होते. तर अशा चांगल्या दिग्दर्शकांकडून खूप शिकायलं मिळालं. आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला आता २४ वर्ष पुर्ण झाली आहेत. तर मॉडेलिंगमध्ये मला ३४ वर्ष पुर्ण झाली आहेत.  

रील आणि रिअल लाईफमध्ये फरक आहे. कोणतंही फिल्म स्कूल हे तुम्हाला कलेत मिसळवू  शकतं. पण, ती आग तुमच्यात असायला हवं. चित्रपटाच्या सेटवर प्रचंड गर्दी असते. अशावेळी कलेवर लक्ष क्रेंदीत करावं लागतं.  मी ३४ तेलगू , १७ तमिळ, १७ कन्नड आणि ७ मल्याळम चित्रपट केलेत. मला राजामोली यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आता राजामौली यांना बाहूबली आरआरआरसाठी ओळखलं जातं. पण, त्याचा पहिला हीट चित्रपट Simhadri हा होता. नुकतंच राजामौली यांची डॉक्यूमेंटरी आली. त्यामध्येही त्यांनी माझा उल्लेख केलाय. मला असं वाटतं अनुभव गरजेचा आहे. लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. ऑटोनं प्रवास करणं, ऑटो चालकासोबत गप्पा मारणं हे मी करतो. यातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. 

ओटीटीवर चित्रपट पाहण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये वाढत आहे. ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षक वाट पाहतात, त्यामुळे ओटीटीमुळे थिएटरमध्ये चित्रपट चालत नाहीत असं वाटतं का?

मला वाटतं अनेक चित्रपट चालले आहेत. तुम्ही जर पाहिलं सनी देओल यांचा गदर २ हा चित्रपट हीट झाला. स्त्री २ चित्रपटानं मोठा गल्ला जमवला. शाहरुख खानचा जवानदेखील हीट झाला. कधीच विचार केला नव्हता की ओटीटीसारखं माध्यमं येईल. ओटीटी हे टिव्हीसारखचं माध्यम आहे. ओटीटीमुळे एका चांगलं काम झालं आहे. प्रत्येकाला काम मिळत आहे. ओटीटी उशीरा आल्यामुळे ते स्विकारायला थोडा वेळ जात आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांच पोटं भरतं. आता येत्या काळात माझे तीन प्रोजेक्ट येणार आहेत.

टॅग्स :राहुल देवबॉलिवूडहिना खानसेलिब्रिटी