पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मानहानीप्रकरणी गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयानं राहुल गांधींना (Rahul Gandhi ) दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात ओम बिर्ला यांनी आदेशही काढले. राहुल गांधींवर करण्यात आलेल्या या कारवाईवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका चालवली आहे. अशात आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker ) हिचं ट्वीट चर्चेत आलं आहे. तुम्ही सो कॉल्ड पप्पूला इतका घाबरलात की कायद्याचा दुरूपयोग केला असा खोचक सवाल तिने केला आहे.
स्वराचं ट्वीट
सो कॉल्ड पप्पूला ते इतके घाबरलेत आहेत की त्यांनी कायद्याचा दुरूपयोग केला. वाढती लोकप्रियता आणि लोकांचा प्रचंड विश्वास कमावणारे राहुल गांधी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढू नयेत, फक्त यासाठी हे केलं गेलं. पण माझ्या मते, राहुल गांधी यातून आणखी मजबूत होऊन मैदानात उतरतील..., अशा आशयाचं ट्वीट स्वराने केलं आहे. स्वराचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. स्वरानं यापूर्वीही राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी अनेकदा ट्विट्स केले आहेत.
स्वरा भास्कर गांधीच्या भारत जोडो यात्रेतही स्वरा सहभागी झाली होती. काही दिवसांपूर्वी स्वराने लग्न केलं. तिच्या दिल्लीतील रिसेप्शनला राहुल गांधींनी हजेरी लावली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
नेमकं प्रकरण काय?पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी त्यांचा अपमान केल्याचा दावा करत यासंदर्भात गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुरुवारी न्यायालयाने आपला निकाल सुनावला. त्यानुसार राहुल गांधींना दोषी सिद्ध करून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. अर्थात त्यांना लागलीच जामीनही मंजूर करण्यात आला. या प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांचीशिक्षा सुनावली गेल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला. एखाद्या खासदाराच्या निलंबनासाठी त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होऊन त्याला किमान २ वर्षांची शिक्षा सुनावली जाण्याची अट आहे.