Raj Kapoor- Nargis Love Story: ‘बॉबी’ या सिनेमात ऋषी कपूर दाराबाहेर उभा असतो आणि डिंपल दार उघडते. हाताला भज्याचं पीठ लागलेलं असतं. त्याच हातानं ती डोळ्यासमोरची केसांची बट मागे घेते आणि भज्याचं पीठ तिच्या केसांना लागतं. डिंपल ऋषी कपूर काहीतरी बोलेल या प्रतीक्षेत असते आणि ऋषी तिच्या डोळ्यांत हरवला असतो.... ‘बॉबी’चा हा सीन अगदी हुबेहुब राज कपूर (Raj Kapoor) यांच्या आयुष्यात घडला होता, हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आज राज कपूर यांचा वाढदिवस (Raj Kapoor Birthday Anniversary). आज यानिमित्तानं हाच किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
होय, वयाच्या 22 वर्षी राज कपूर असेच नर्गिसच्या (Nargis ) डोळ्यांत हरवले होते. राज आणि नर्गिस या दोघांची पहिली भेटही ‘बॉबी’च्या सीन सारखीच झाली होती. कामानिमित्त एकदा राज कपूर नर्गीसची आई जद्दन बाईकडे गेले होते. जद्दन बाई घरी नव्हत्या, होती ती नर्गीस. ती भजी तळत असावी. दारावर थाप पडली आणि ती धावतपळत दार उघडायला धावली. दारात राज कपूर उभे होते आणि नर्गीसला पाहून अगदी सेम ‘बॉबी’मधल्या ऋषी सारखी त्यांची अवस्था झाली होती. नर्गिसच्या केसांनाही बेसन लागलं होतं. याच क्षणाला राज कपूर नर्गिस यांच्या निरागस चेह-यावर भाळले होते.
ही रिअल लाईफ सीन पुढे राज कपूर यांनी ‘बॉबी’ सिनेमात ऋषी व डिंपल यांच्यावर चित्रीत केला होता.
इथून पुढे नर्गिस व राज कपूर यांच्या भेटी वाढत गेल्या. दोघांनीही एकत्र काम करण्यास सुरूवात झाली. या काळात प्यार हुआ, इकरार हुआ... !! 9 वर्ष दोघंही नात्यात होती. पण राज कपूर आधीच विवाहित होते. आपल्यासाठी राज कधीच आपल्या पत्नीला सोडणार नाहीत, हे 9 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर नर्गिसच्या लक्षात आलं होतं. अखरे तिने राज यांच्यासोबतचं सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. असं म्हणतात की, यानंतर ती कधीच राज कपूर यांना भेटली नाही. एकंदर काय तर एक प्रेम कहाणी कायमची अधुरी राहिली...