ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकार राज कूपर यांचे जन्मस्थान असलेली पाकिस्तानातील पेशावरमधील हवेली लवकरच इतिहासजमा होणार आहे. खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ही हवेली वाचवण्यासाठी ठोस योजना सादर न केल्यामुळे ही ९८ वर्ष जुनी हवेली पाडण्याचे काम सुरु झाल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सने स्थानिक वृत्तपत्राच्या हवाल्याने दिली आहे.
गुरुवारी या हवेलीचे छप्पर पाडण्यात आले. पेशावरमधील धाकी मुनावर शहा भागात ही इमारत आहे. राजकपूर यांच्या पूर्वजांनी बांधलेली मूळ हवेली सहा मजली होती. मात्र दोन दशकापूर्वी इमारत कमकुवत झाल्याचे कारण पुढे करुन या इमारतीचे तीन मजले पाडण्यात आले.
थेट हवेली पाडली तर कारवाई होऊ शकते त्यामुळे हळूहळू ही हवेली पाडण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी हॉटेल किंवा मॉल उभारण्याची योजना आहे. १४ डिसेंबर १९२४ रोजी राज कपूर यांचा या हवेलीत जन्म झाला होता. राज कपूर यांचे बंधु शमी कपूर आणि शशी कपूर यांचा जन्म भारतात झाला पण त्यांनी या हवेलीला भेट दिली होती.
१९४७ साली फाळणीनंतर कपूर कुटुंब भारतात आले त्यानंतर या हवेलीची मालकी दुस-याकडे गेली. राज कपूर यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले तरी, त्यांच्या मुलांनी वेळोवेळी या हवेलीला भेट दिली होती. राज कपूर यांचे मुलगे रणधीर कपूर आणि ऋषी कपूर १९९० मध्ये या हवेलीमध्ये आले होते. त्यावेळी स्थानिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते.
प्रशासनाने आताच्या मालकाकडून हे घर खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. या घराचे संग्रहालयामध्ये रुपांतर करण्याची योजना होती. मात्र किंमतीच्या मुद्यावरुन व्यवहार फिस्कटला.