Join us

"अशोक सराफ दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 12:26 PM

राज ठाकरेंचा एक व्हिडिओ गौरव मोरेने शेअर केला आहे. यामध्ये ते अशोक सराफ यांचं कौतुक करत आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि उत्कृष्ट नट असलेले सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ यांना नुकताच शासनाचा 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी त्यांच्या चतुरस्त्र अभिनयाने प्रेक्षकांची हृदयात स्थान मिळवलं आहे. विनोदी, गंभीर अशी कुठलीही भूमिका असो त्यांनी कायमच अभिनयाची बॅटिंग केली आहे. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही छाप पाडणाऱ्या अशोक सराफ यांच्याबद्दल बोलतानाचा राज ठाकरेंचा एक व्हिडिओ  सध्या व्हायरल होत आहे. 

एका फॅन पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशोक सराफ यांचं कौतुक करत आहेत. ते म्हणतात, "ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो. मी त्यांची अनेक नाटके आणि सिनेमे पाहिले आहेत. त्यांचं डार्लिंग डार्लिंग हे नाटक मला अजूनही आठवतं. त्या काळापासून आत्तापर्यंत मला वाटतं अशोक सराफ हे एकमेव अभिनेते आहेत की समोर कोणीही असू दे त्यांना फरक पडला नाही. नाटकावर आणि चित्रपटावर ते स्वत:ची छाप पाडायचे. ही साधी सोपी गोष्ट नाही."

"मी त्यांचं व्हॅक्यूम क्लिनर हे नाटक पाहण्यासाठी गेलो होतो. नाटकात अशोक सराफांची एन्ट्री होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ५०-६० वर्ष स्वत:बद्दलचं कुतूहल जागरुक ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर एखाद्या ऑडिटोरियमचा कोपरा नि कोपरा भरला जातो. अशोक सराफ ही व्यक्ती तर दक्षिणेत असती तर आज मुख्यमंत्री असती. ४० फूटच्या तुमच्या कटआउटवर दूध टाकलं गेलं असतं. मी विचार करत होतो, खरंच हा दागिना सराफाच्या घरीच मिळू शकतो," असंही पुढे राज ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरेंचा हा व्हिडिओ महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत गौरवने "वाह" असं कॅप्शन देत इमोजी पोस्ट केले आहेत. 

टॅग्स :अशोक सराफराज ठाकरेमहाराष्ट्राची हास्य जत्रा