काल मराठी भाषा दिनानिमित्ताने 'तिकिटालय' या ॲपचं उद्धाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे, प्रशांत दामले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने केलं. याच कार्यक्रमात भाषण करताना राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षणची चांगलीच शाळा घेतलेली दिसली.
राज ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा ते म्हणाले, "संकर्षणजी त्यादिवशी नाट्यसंमेलनात मी एक वाक्य बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे. त्यामुळे चंकू सर असं काही नसतं. चंद्रकांत कुलकर्णी सर असं मी समजू शकतो. त्यामुळे आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे." असं म्हणत राज ठाकरेंनी संकर्षणची शाळा घेतली.
पुढे राज ठाकरेंनी सर्वांना एक धम्माल किस्सा सांगितला, "मला परवा श्रीरंग गोडबोले भेटले. ते म्हणाले .. मी कॅफे गुडलकमध्ये बसलो होतो. तेव्हा मी सांगितलं मला दोन आनंदरावांची ऑम्लेट द्या. आता अंड्या बोलायचं नाही असं म्हटल्यावर..." हा किस्सा ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.