मुंबई-
मुंबईत ‘अथांग’ या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितनं राज ठाकरे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. यात राज ठाकरे यांनी तजेस्वीच्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. यात राज ठाकरेंनी सिनेमाचं दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली तर आवडेल असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांवर तीन भागात सिनेमा काढण्याचा मानस असल्याचं म्हटलं आहे.
सिनेमा ही तुमची पॅशन आहे, मग तुम्ही आम्हाला दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहात का?, असा प्रश्न तेजस्वीनी पंडितनं राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी एकावेळी दोन दगडांवर पाऊल ठेवून काम करणं सोपं नाही असं म्हणत संधी आणि वेळ मिळाला तर नक्की विचार करेन अशी भावना व्यक्त केली.
"राजकारण आणि चित्रपट या दोन मोठ्या गोष्टी आहेत. दोन दगडांवर पाय ठेवून चालणं सोपं नाही. आपल्या देशातली अडचणी अशी आहे की निवडणूक हा एक धंदा आहे. निवडणुका संपतच नाहीत. एक झाली की दुसरी अशा सुरूच असतात. त्यामुळे दिग्दर्शन विषयाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला तर नक्कीच काम करेन. माझ्या डोक्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करण्याचा विचार आहे. पण आताच इतके सिनेमे महाराजांवर येऊन गेलेत की आता लगेच त्याला हात लावण्यास माझी हिंमत होत नाही", असं राज ठाकरे म्हणाले.
"मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा गांधी चित्रपट पाहायचो त्यावेळेला मला महाराजांवरही अशी मोठी फिल्म झाली पाहिजे असं वाटायचं. माझं आता त्यावर काम सुरू आहे आणि तीन भागात छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा येईल", अशीही माहिती यावेळी राज ठाकरे यांनी दिली.
मी हार्डकोअर कट्टर मराठीराज ठाकरे यांनी यावेळी आपलं मराठीवरचं प्रेमही बोलून दाखवलं. "मराठी सिनेमा किंवा भाषेसाठी प्रत्येकजण त्याच्या परीनं काम करत असतो. मला माझ्या घरातूनच जे संस्कार मिळालेत म्हणजे माझ्या आजोबांकडून, काकांकडून मराठीबाबतचे संस्कार मला मिळालेत. मी स्वत: हार्डकोअर कट्टर मराठी आहे. त्यामुळे ज्या ज्यावेळी मला शक्य असतं तिथं मी मराठी भाषेसाठी उभा राहतो. मी काही कुणावर उपकार करत नाही. ते माझं काम आहे तेमी करतो", असं राज ठाकरे म्हणाले.