आजवर अनेक स्टारकिड्सने आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. यात काही स्टारकिड्स यशस्वी झाले. तर, काहींच्या पदरात मात्र अपयश आलं. यात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला. त्यांना सिनेमात घेण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक त्यांच्या दारापुढे रांगा लावत होते. परंतु, त्यांच्या मुलांना सपशेल अपयश मिळालं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका स्टारकिडची चर्चा रंगली आहे.
राणी मुखर्जी हिची मुख्य भूमिका असलेला राजा की आयेगी बारात हा सिनेमा आठवतो का? या सिनेमात राणीच्या नवऱ्याची भूमिका अभिनेता शादाब खान याने साकारली होती. विशेष म्हणजे शादाब हा बॉलिवूडचा गब्बर अर्थात अभिनेता अमजद खान याचा लेक आहे. परंतु, शादाब त्याच्या वडिलांसारखी फारशी कमाल करु शकला नाही. त्यामुळे या सिनेमानंतर तो मोजक्या काही चित्रपटांमध्ये झळकला आणि त्यानंतर इंडस्ट्रीपासून दूर झाला. त्यामुळे तो सध्या काय करतो, कसा दिसतो असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.
शादाबने १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर फारशी पडली नाही. या सिनेमानंतर तो बेताबी या सिनेमातही काम केलं. मात्र, तिथेही त्याला अपयश आलं. एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या फिल्मी करिअर आणि डेब्यू फिल्मविषयी भाष्य केलं.
"मला त्यावेळी राजा की आयेगी बारात या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करायचं नव्हतं. तेव्हा माझं वय कमी होतं. माझं वजन १४५ किलो होतं. वजन कमी केल्यानंतर मी लगेचच हा सिनेमा साइन केला. ज्यामुळे मी सिनेमामध्ये एकदम बारीक, चिडचिडा दिसत होतो. माझा फोटो एका मॅगझीनच्या फोटोवर पाहिल्यानंतर मी हिमालय पुत्र या सिनेमातून डेब्यू करावं अशी विनोद खन्ना यांची इच्छा होती. पण, तसं झालं नाही. आणि, मला राजा की आयेगी बारात या सिनेमातून डेब्यू करावा लागला", असं शादाब म्हणाला.
दरम्यान,पहिल्या सिनेमानंतर जवळपास त्याचे सगळेच सिनेमा फ्लॉप झाले. त्यानंतर त्याने अभिनयातून काढता पाय घेतला. त्याने शांती मेमोरियल आणि मर्डर ही दोन पुस्तकदेखील लिहिली आहेत. तसंच काही सिनेमाचं स्क्रिप्टदेखील लिहिली आहे. २०१९ मध्ये जॉन अब्राहमच्या रोमिया अकबर वाल्टर या सिनेमात त्याने काम केलं होतं. त्यानंतर हल्लीच २०२० मध्ये स्कॅम 1992 या सीरिदमध्ये छोटेखानी भूमिका साकारली होती.