एकीकडे सिनेमागृहात 'छावा' सिनेमा धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे ओटीटीवर मात्र 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' ही वेब सीरिज गाजत आहे. डॉ. प्रकाश कोयंडे यांच्या 'प्रतिपाश्चंद्र' या कादंबरीवर आधारित या वेब सीरिजची कथा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिनाच्या शोधात असलेल्या आणि त्या खजिन्याचं संरक्षण करणाऱ्या एका शिलेदाराची ही कथा आहे. यामध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असून त्याने शिलेदाराच्या वंशाजाची भूमिका बजावली आहे. तर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरदेखील या सीरिजमध्ये झळकली आहे. या सीरिजच्या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'ला खास मुलाखत दिली.
या मुलाखतीत राजीवने सई ताम्हणकरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, "सईला मी या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच भेटलो. मी तिला आधीपासून ओळखत होतो. पण, आमची कधी भेट झाली नव्हती. लूक टेस्टच्या वेळी सईच माझ्या मेकअपरुममध्ये येऊन मला "हॅलो राजीव भाई..." असं म्हणाली होती. तेव्हापासूनच आमच्यात मैत्री झाली होती. सईची सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की तिचा कामावर फोकस आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करताना मला मजा आली".
सईने या वेब सीरिजमध्ये एका सिक्रेट एजंटची भूमिका साकारली आहे. 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' ही वेब सीरिज हॉटस्टारवर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये राजीव आणि सईसोबतच गौरव अमलानी, दिलीप प्रभावळकर, आशिष विद्यार्थी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.