राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांनी बॉबी या डिम्पल यांच्या पहिल्या चित्रपटाच्या आधीच लग्न केले होते. या वेळी राजेश खन्ना हे सुपरस्टार होते. डिम्पल यांना सिम्पल नावाची एक बहीण असून तिने देखील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिंपल जवळजवळ १० वर्षं तरी बॉलिवूडमध्ये अभिनय करत होती. तिने या दरम्यान एहसास, जीवन धारा, तुम्हारे बीना, हम रहे ना हम, प्यार के दो पल, मन पसंद, लुटमार, जमाने के दिखाना है, दुल्हा बिकता है यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या परख या चित्रपटानंतर सिंपल अभिनयक्षेत्रापासून दूर गेली. सिंपलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी अनुरोध हा चित्रपट वगळता तिला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. अनुरोध या चित्रपटाद्वारे तिने तिच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली होती आणि विशेष म्हणजे या चित्रपटात ती राजेश खन्ना यांच्यासोबत झळकली होती. आपल्या जीजूसोबत चित्रपटात रोमान्स करताना खूप विचित्र वाटत असल्याचे तिने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले होते. अभिनय क्षेत्रात यश न मिळाल्यानंतर सिंपलने एका वेगळ्याच क्षेत्रात भाग्य आजमावले. तिने कॉश्च्युम डिझायनर म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले. या क्षेत्रात तिला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली. रुदाली या चित्रपटासाठी तर तिला बेस्ट कॉस्च्युम डिझायनरचा पुरस्कार देखील मिळाला होता.
सिंपल अभिनयक्षेत्रात कार्यरत असताना रंजीत आणि तिच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा मीडियात झाली होती. रंजीत आणि तिने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले होते. पण राजेश खन्ना यांना हे प्रेमप्रकरण मान्य नव्हते आणि त्यावरून एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान राजेश खन्ना आणि रंजीत यांचे भांडण देखील झाले होते. राजेश खन्ना यांची संमती नसल्याने सिंपलने या नात्याला पूर्णविराम दिला असल्याचे म्हटले जाते. सिंपल यांचे काही वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले होते.