बॉलिवूडमध्ये आज असंख्य कलाकार सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. परंतु, कलाविश्वातील पहिले सुपरस्टार कोण? असा प्रश्न विचारला तर सहाजिकच दिवंगत अभिनेता राजेश खन्ना (rajesh khanna) यांचं नाव घेतलं जाईल. आपल्या अनोख्या अभिनयशैलीमुळे राजेश खन्ना यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.१९ डिसेंबर १९४२ रोजी अमृतसरमध्ये जन्म झालेल्या राजेश खन्ना यांना ‘आराधना’ (aradhana) या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाशी निगडीत त्यांचा एक भन्नाट किस्सा आहे. एकीकडे हा चित्रपट सुपरहिट ठरत होता. तर दुसरीकडे, राजेश खन्ना यांनी चित्रपटगृहातून चक्क पळ काढावा लागला होता.
दिल्लीतील रीगल सिनेमागृह (regal theater) साऱ्यांनाच ठावूक असेल. एकेकाळी या चित्रपटगृहामध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचे प्रीमियर व्हायचं. अगदी राज कपूरपासून ते धर्मेंद्र, मीना कुमारी अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या चित्रपटाचे प्रीमियर या सिनेमागृहात पार पडले होते. याच काळात १९६९ मध्ये राजे खन्ना यांचा आराधना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा दिल्लीत एक शो ठेवण्यात आला होता. त्यामुळे राजेश खन्ना आपल्या ड्रायव्हरसोबत या शोसाठी जात होते. परंतु, हा शो ज्या ठिकाणी होता त्याबद्दल त्यांचा ड्रायव्हर थोडा साशंक होता आणि त्याने चुकून रीगल सिनेमाहॉलसमोरचं गाडी थांबवली. मात्र, ही गाडी वाटेत थांबताच राजेश खन्ना यांना एका कारणामुळे उलट्या पावली परत जावं लागलं.
'या' कारणामुळे राजेश खन्ना यांनी काढला पळ
ड्रायव्हरने चुकून रीगल सिनेमागृहासमोर गाडी उभी केल्यामुळे आपल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी राजेश खन्ना गाडीतून खाली उतरले. परंतु, चित्रपटगृहाबाहेर उभ्या असलेल्या प्रेक्षकांनी राजेश खन्ना यांना बरोबर ओळखलं आणि त्यांनी अभिनेत्याला घेरा घातला. या गर्दीतून राजेश खन्ना कसेबसे बाहेर पडले. इतकंच नाही तर ते धावत जाऊन गाडीत बसले आणि ड्रायव्हरला गाडी जोरात चालवायला सांगितली.
दरम्यान, त्याकाळी आराधना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना यांच्यासोबत शर्मिला टागोर यांनी स्क्रीन शेअर केली होती.