बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी जीवनात अनेक चढउतार पाहिले. राजेश खन्ना यांनी यशाचं शिखरही पाहिलं आणि पडता काळही पाहिला. राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एका पाठोपाठ जवळपास १५ चित्रपट सुपरहिट दिले. त्यामुळे भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार हा दर्जा त्यांना मिळाला होता. मात्र, एक काळ असा आला होता. ज्यावेळी ते प्रचंड एकाकी पडले होते. इतकंच नाही तर त्यांच्या पडत्या काळात त्यांच्या जवळच्या व्यक्तींनीही त्यांची साथ सोडली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजेश खन्ना प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्यात प्रचंड अॅटीट्यूड निर्माण झाला होता. परंतु, याच बदललेल्या स्वभावामुळे त्यांना नंतरच्या काळात एकाकी जीवन जगावं लागलं. आनंद एका पुस्तकात राजेश खन्ना यांच्या पडत्या काळाचा उल्लेख करण्यात आला आहे.
ठराविक काळानंतर राजेश खन्ना यांचे चित्रपट फ्लॉप ठरु लागले. त्यामुळे ते स्वत:ला एकटं समजू लागले होते. आनंद बक्षी यांचा मुलगा राकेश बक्षी यांनी लिहिलेल्या पुस्तकात राजेश खन्ना आणि आनंद बक्षी यांच्यातील संवाद लिहिला आहे. मला खूप एकटं पडल्यासारखं झालंय. त्यामुळे तुम्हाला फोन केला. मला कोणीच फोन करत नाही, असं राजेश खन्ना यांनी आनंद बक्षींना फोन करुन सांगितलं होतं. त्यावर माझ्या वडिलांनी राजेश खन्ना यांना भावनिक आधार दिला.
दरम्यान, राजेश खन्ना यांच्या मिलन आणि आराधना या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्यानंतर रास्ते, आन मिलो सजना, कटी पतंग, द ट्रेन, अपना देश, नमक हराम, अजनबी, प्रेम कहानी, महबूबा अशा कितीतरी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली होती.