दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार अर्थात रजनीकांत (rajinikanth) यांच्या अभिनयाविषयी आणि लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगायला नको. रजनीकांत जिथे जातील, तिथे त्याच्याभोवती गर्दी जमते. सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. नुकतेच रजनीकांत यांचा युएई सरकारकडून सन्मान करण्यात आला आहे. UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीचा गोल्डन व्हिसा त्यांना मिळाला आहे. त्यांनी स्वतः ही माहिती सर्व चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
रजनीकांत यांना यूएईच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे. ते नुकतेच अबुधाबीला गेले होते. जिथे त्यांना हा सन्मान मिळाला. या सन्मानाबद्दल रजनीकांत यांनी UAE सरकार आणि लुलू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमए युसूफ अली यांचे आभार मानले आहेत. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यामध्ये रजनीकांत गोल्डन व्हिसा स्विकारताना दिसून येत आहेत.
व्हिडीओमध्ये दिसते की रजनीकांत म्हणतात, 'अबू धाबी सरकारकडून प्रतिष्ठित असा UAE गोल्डन व्हिसा मिळाल्याने मला खूप सन्मान वाटतोय. या व्हिसासाठी आणि सर्व सहकार्यासाठी मी अबुधाबी सरकार आणि माझे चांगले मित्र युसुफ अली, लुलू ग्रुपचे सीएमडी यांचे आभार मानतो'. गोल्डन व्हिसाचा अर्थ असा आहे की आता रजनीकांत हे पुढील 10 वर्षे यूएईमध्ये राहू शकतात. संयुक्त अरब अमिरात गोल्डन व्हिसा सहजासहजी कोणत्याही नागरिकाला देत नाही.
यूएईकडून हा व्हिसा जगातील मान्यवर व्यक्तींना दिला जातो. हा व्हिसा दहा वर्षांसाठी देण्यात येतो त्यानंतर पुढं त्याचं नूतनीकरण केलं जातं. गोल्डन व्हिसा मिळवणारे रजनीकांत हे काही पहिलेच भारतीय सेलिब्रेटी नाहीत. यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना हा बहुमान मिळाला आहे. त्यात शाहरुख खान, संजय दत्त, सानिया मिर्झा, बोनी कपूर, वरुण धवन, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, सुनील शेट्टी, नेहा कक्कर, रणवीर सिंह, कमल हासन, मोहनलाल, दलकीर सलमान, फराह खान, सोनू सुद आणि क्रिती सनॉन यांच्या नावाचा समावेश आहे.