रजनीकांत (Rajinikanth) यांची विशेष भूमिका असलेला 'लाल सलाम' (Lal Salaam) उद्या म्हणजेच ९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 'लाल सलाम' हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. याशिवाय खेळाभोवती फिरणारं धर्माचं राजकारण या सिनेमातून मांडण्यात आलंय. रजनीकांत यांच्या या नवीन सिनेमाची उत्सुकता असतानाच या सिनेमाला मोठा फटका बसलाय. काही देशांमध्ये 'लाल सलाम'वर बंदी घालण्यात आलीय.
इस्लामिक देश कुवेतमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आहे. ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 'लाल सलामच्या निर्मात्यांना यामुळे मोठा धक्का बसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'लाल सलाम' हा संवेदनशील विषयावरील चित्रपट असल्याने या चित्रपटावर कुवेतमध्ये बंदी घालण्यात आलीय. 'लाल सलाम'पूर्वी कुवेतमध्ये 'फायटर' चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती. याशिवाय 'सम्राट पृथ्वीराज', 'बीस्ट', 'बेलबॉटम', 'कुरूप' आणि 'द डर्टी पिक्चर'वरही कुवेतमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
'लाल सलाम' या चित्रपटात रजनीकांत आणि क्रिकेटपटू कपिल देव यांचा जबरदस्त कॅमिओ आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतही या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या दुनियेत कमबॅक करत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, जो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला आहे. 'लाल सलाम' उद्या ९ फेब्रुवारीला सगळीकडे प्रदर्शित होत आहे.