Join us  

रजनीकांतच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक नको - कोर्टाने चाहत्यांना खडसावले

By admin | Published: March 31, 2016 12:27 PM

सुरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्या पोस्टर्सवर अभिषेक करून दूध वाया घालवू नका असे आदेश न्यायालयाने चाहत्यांना दिले आहे.

ऑनलाइ लोकमत
चेन्नई, दि. ३१ - अभिनेता रजनीकांतला दक्षिणेत देव मानले जाते, चाहत्यांचे त्याच्यावर इतके प्रेम आहे की त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी पूजा वगैरे करून प्रार्थना केल्या जातात, त्याचे पोस्टर व कटआऊट्सना दुग्धाभिषेक घातला जातो. मात्र आता या उत्साही चाहत्यांना त्यांच्या या कृत्यांना आवर घालावा लागणार आहे. कारण कोर्टानेच तसे आदेश देत त्यांना दूध वाया न घालवण्याची सूचना केली आहे. 
सामाजिक कार्यकर्ते डॉ. आय.एम.एस. मणीवन्नन यांनी २६ मार्च रोजी कोर्टात दाखल केली होती. देशातील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाला असून त्याच पार्श्वभूमीवर उत्साह व आनंदाच्या भरात चाहत्यांकडून रजनीकांत यांच्या पोस्टर वा कट-आऊट्सना दुग्धाभिषेक करून दुधाची नासाडी होऊ नये यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने रजनीकांत यांना नोटीसही बजवाली होती. 
अखेर या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने चाहत्यांना दुधाची नासाडी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रजनीकांत यांनीही पुढाकार घेऊन चाहत्यांना असे करण्यापासून रोखावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 
' देशात गरिबीमुळे अनेक लहान मुले कुपोषित आहेत. रजनीकांत यांची पोस्टर्स वा कटआऊट्सला दुधाचा अभिषेक करून लाखो लीटर दूध वाया घालवले जाते, तेच दूध त्या मुलांना दिले पाहिजे. रजनीकांत यांनीही आपल्या चाहत्यांना दूध वाया न घालवण्याचे आवाहन केले पाहिजे' असे मत याचिकाकर्ते मनिवन्नन यांनी व्यक्त केले. 
याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ एप्रिल रोजी होणार आहे.