अखेर साऊथचे मेगास्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी राजकारणाला कायमचा रामराम ठोकला. (Rajinikanth quit politics) वर्षभरापूर्वी ‘रजनी मक्कल मंद्रम’ या राजकीय पक्षाची सुरूवात त्यांनी केली होती. त्यांचा हा पक्ष राज्यातील निवडणूक लढवणार होता. पण आता रजनीकांत यांनी आपला हा पक्षच विसर्जित केला. त्याऐवजी या एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना त्यांनी केली आहे. राजकारणातून बाहेर पडत आता एनजीओमार्फत लोकांची सेवा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. 2021 च्या नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहिर केले. अर्थात त्यांनी राजकारणात यावे, हा चाहत्यांचा आग्रह कायम होता. केवळ आग्रह नाही तर चाहत्यांनी यासाठी निदर्शने, आंदोलन सुरु केले होते. पण रजनीकांत यांचा निर्णय ठाम होता. आता त्यांनी आपल्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
भविष्यात राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही...‘मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा आणि राजकारणात सक्रिय होण्याच विचार केला होता. परंतु शक्य झालं नाही. भविष्यात राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्यामुळे रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचं रासिगर नारपानी मंद्रम किंवा रजनीकांत फॅन्स वेलफेअर चॅरिटी फोरममध्ये रूपांतर करण्यात येईल. म्हणून काम करेल,’ अशी माहिती त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनातून दिली आहे.
मला वेदना देऊ नका..प्रकृती कारणास्तव राजकारणात येण्याचा निर्णय मी रद्द केला आहे, असे गेल्या जानेवारीत रजनीकांत यांनी जाहिर केले होते. मात्र त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांची घोर निराशा झाली होती. रजनीकांत यांनी आपला निर्णय बदलावा, यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. यानंतर रजनीकांत यांनी कृपया मला वेदना देऊ नका, अशा आशयाची पोस्ट केली होती. ‘राजकारणात येण्याचा निर्णय मी का रद्द केला, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. कृपा करून माझ्यावर राजकारणात येण्यासाठी दबाव टाकू नका. मला वेदना देऊ नका,’असे त्यांनी म्हटले होते.