Rajinikanth : 2023 हे अनेक अभिनेत्यांसाठी कमबॅक बेस्ट कमबॅक इअर ठरले आहे. शाहरुख खानने 10-11 वर्षांनंतर 'पठाण'च्या रुपाने ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. सनी देओलनेही 'गदर 2' च्या माध्यमातून दमदार पुनरागमन केले. अक्षय कुमारचीही 'OMG 2' मधून वापसी झाली. फक्त बॉलिवूड नाही, तर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही 'जेलर'मधून जोरदार कमबॅक केले. जेलरने जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली. आता रजनीकांत यांच्या हाती नवा चित्रपट लागला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन एक सुपरहिट व्यक्तीच्या हाती गेले आहे.
'जेलर'च्या यशानंतर सन पिक्चर्सने रजनीकांत यांच्यासोबत नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सध्या याला थलायवर 171 असे नाव दिले आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरहिट दिग्दर्शकांमध्ये गणला जाणारा लोकेश कनगराज याच्या खांद्यावर चित्रपटची धुरा सोपवली आहे. रजनीकांत आणि लोकेश कनगराज यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. 'थलैवर 171' हा अॅक्शन थ्रिलर असणार आहे.
लोकेश कनागराज हा तोच दिग्दर्शक आहे, ज्याने नुकताच कमल हसन, विजय सेतुपती आणि फहद फासिलसह 'विक्रम' नावाचा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवला आहे. त्याचा आगामी 'लिओ' चित्रपटदेखील पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. तामिळ सुपरस्टार थलपथी विजय यात प्रमुख भूमिकेत आहे.
सन पिक्चर्सने 'थलैवर 171' चे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होऊ शकतो. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या संगीताची धुरा अनिरुद्ध रविचंदरकडे देण्यात आली आहे. अनिरुद्धने 'जेलर', 'विक्रम', 'पेट्टा' आणि शाहरुखच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'जवान'सह अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. आगामी 'लिओ'मध्येही अनिरुद्धने संगीत दिले आहे.