प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आणि हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखक राजकुमार संतोषी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार संतोषी ज्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'गांधी गोडसे एक युद्ध' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय संतोषी यांच्यावर सिनेमाचे सहनिर्माते झुलन प्रसाद गुप्ता यांचा चेक बाऊन्स झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे राजकुमार यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलंय. नेमकं प्रकरण काय?
पोलिसांकडून संतोषींविरोधात अटक वॉरंट
नि चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही तारखेला राजकुमार संतोषी कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे संतोषींविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार ६ जुलै २०२४ रोजी नवी दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाने चित्रपट निर्माता राजकुमार संतोषी यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. निर्माते झुलन यांनी एनआयच्या कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. राजकुमार संतोषींनी झुलन यांना दिलेला एक कोटी रुपयांचा संपूर्ण चेक बाऊन्स झाला आहे. पैसे न दिल्याने संतोषी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निर्मात्यांचं म्हणणं काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, झुलन प्रसाद गुप्ता याप्रकरणी म्हणाले की, “मी राजकुमार संतोषी यांना बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखत होतो. पण एक व्यक्ती म्हणून मला त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. जेव्हा त्यांनी पैसे मागितले तेव्हा ते माझे पैसे परत करणार नाहीत याची मला कल्पनाही येत नव्हती. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी मला दिलेला चेक बाऊन्स झाला. त्यामुळे भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून मी न्यायालयात गेलो."
निर्माते पुढे म्हणतात , "राजकुमार संतोषी दिलेल्या तारखांना न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध हे समन्स आणि नोटीस बजावण्यात आली आहे. मला न्यायालयाकडून न्याय मिळण्याची पूर्ण आशा आहे." याप्रकरणाला पुढे कोणतं वळण लागणार, याशिवाय राजकुमार संतोषींवर पोलीस काय कारवाई कारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.