Join us

रजनी जुलैमध्ये राजकारणात?

By admin | Published: May 28, 2017 4:14 AM

असंख्य चाहते आणि हितचिंतकांची प्रबळ इच्छा लक्षात घेऊन तामिळ सुपरस्टार रजनीकांत कदाचित येत्या जुलैमध्ये राजकारण प्रवेशाची घोषणा करू शकेल, असे रजनीचे

बंगळुरू : असंख्य चाहते आणि हितचिंतकांची प्रबळ इच्छा लक्षात घेऊन तामिळ सुपरस्टार रजनीकांत कदाचित येत्या जुलैमध्ये राजकारण प्रवेशाची घोषणा करू शकेल, असे रजनीचे भाऊ सत्यनारायणराव गायकवाड यांनी सांगितले.रजनीकांतचा राजकारण प्रवेश नक्की असल्याचे संकेत देत सत्यनारायणराव म्हणाले की, रजनीकांतने राजकारणात उतरावे अशी लोकांची इच्छा आहे.रजनीकांतने चाहत्यांची आणि हितचिंतकांची मते जाणून घेण्यासाठी भेटींची पहिली फेरी पूर्ण केली. त्यात रजनीने राजकारणात उडी घ्यावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे जाणवले.अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकाधिक चाहत्यांशी बोलावे, असे रजनीकांतला वाटते. त्यासाठी आणखी भेटीगाठी होतील. पण रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाला मिळत असलेला भरघोस पाठिंबा पाहता रजनी चाहत्यांना नक्कीच नाराज करणार नाही, अशी खात्री वाटते, असे ते म्हणाले.चाहत्यांच्या भेटींमध्ये रजनीकांतने राजकारण प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले नव्हते. तमिळनाडूमध्ये काही राजकीय नेते चांगले आहेत, पण व्यवस्था सडकी आहे, असे सांगून रजनीने चाहत्यांना ही व्यवस्था साफ करण्यासाठी पुढे येण्याचे व ‘लढाई’साठी तयार राहण्याचे आवाहन केले होते. हेच सूत्र पकडून सत्यनारायणराव म्हणाले राजकारण आणि सार्वजनिक जीवन भ्रष्टाचारमुक्त करणे हेच रजनीकांतचे मुख्य उद्दिष्ट असेल.रजनीकांतसाठी भाजपाने गळ टाकला असला तरी रजनी स्वत:चा पक्ष स्थापन करेल. त्यादृष्टीने पक्षाचे नाव आणि रचना काय असावी हे ठरविले जात आहे, असेही भावाने सांगितले. (वृत्तसंस्था)