दाक्षिणात्य सुपरस्टार थैलवा रजनीकांत (Rajnikanth) यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईत भेट दिली. यावेळी, त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेटही घेतली. त्यामुळे, रजनीकांत यांची मुंबई भेट महाराष्ट्रात चर्चेची ठरली. तर दुसरीकडे रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajnikanth) यांच्या घरी चोरी झाल्याची बातमी समोर आली. याप्रकरणी तपास केल्यानंतर पोलिसांनी काल २१ मार्च रोजी मोलकरीण आणि ड्रायव्हरला अटक केली आहे. दोघांनी मिळून घरातील सोनं आणि हिऱ्याचे दागिने लंपास केले होते.
माध्यम रिपोर्टनुसार ऐश्वर्याच्या ड्रायव्हरचे नाव व्यंकटेशन आहे. त्याच्या सांगण्यावरुनच घरकाम करणाऱ्या ईश्वरीने १०० तोळं सोनं आणि ३० ग्रॅम डायमंडचे दागिने तर ४ किलो चांदीचे दागिने चोरले. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की ईश्वरीने सर्व दागिने विकले असून मिळालेल्या पैशातून घर खरेदी केले आहे.
ईश्वरी १८ वर्षांपासून ऐश्वर्याच्या घरी काम करत होती. त्यामुळे तिला घराचा कानाकोपरा ठाऊक होता. इतकंच नाही तर तिने अनेकदा याआधीही लॉकर उघडून चोरी केली आहे. तिला चावी कुठे आहे ते माहित होते. पोलिसांना तिच्याकडून रोख रक्कम मिळाली आहे. तसेच नवीन घराचे कागदपत्रही मिळाले आहेत. मागच्या महिन्यात ऐश्वर्याने तक्रार दिल्यानंतर झालेल्या तपासात या गोष्टी समोर आल्या.
रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याने शेवटचं २०१९ मध्ये बहिणीच्या लग्नात दागिने घातले होते. यामध्ये हिऱ्याच्या दागिन्यांचा सेट, सोनं, नवरत्न सेट, हार आणि बांगड्यांचा समावेश होता. हे सर्व तिने लॉकरमध्ये ठेवले होते. मात्र १० फेब्रुवारी रोजी लॉकर उघडताच तिला धक्का बसला. तेनामपेट पोलिसात तिने तक्रार दाखल केली होती.