Rajpal Yadav Birthday : आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता व कॉमेडी किंग राजपाल यादवचा (Rajpal Yadav)आज वाढदिवस. 16 मार्च 1971 रोजी उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे राजपालचा जन्म झाला. येथेच त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि तो नाटकांत लहानमोठ्या भूमिका करू लागला.
12 वी पास झाल्यानंतर एका ऑर्डनन्स क्लॉथ फॅक्टरीमध्ये त्याने टेलरिंगचं काम सुरू केलं. पण त्या कामात मन रमेना. अखेर राजपालने नोकरीला लाथ मारली अन् थेट लखनौ गाठलं. येथे भारतेंदू नाट्य अकादमीत दोन वर्ष अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी तो दाखल झाला. दोन वर्षानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्याने प्रवेश मिळवला. येथून बाहेर पडल्यावर दोन वर्षांनी म्हणजे 1999 मध्ये राजपालला बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली.
1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटात त्याला छोटी भूमिका मिळाली. यानंतर तो अशाच छोट्या छोट्या भूमिका करू लागला. 2000 साली रामगोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ या सिनेमानं मात्र त्याचं नशीब बदललं. यात त्याने साकारलेली सिप्पा या विलनची भूमिका चांगलीच गाजली. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट निगेटीव्ह रोल अवार्ड मिळाला. यानंतर कंपनी, हम किसी से कम नहीं, हंगामा, मुझसे शादी करोगी, प्यार तूने क्या किया अशा अनेक सिनेमात त्याने काम केले. आपल्या हटके विनोदी शैलीमुळे त्याने हळूहळू लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. अर्थात त्यासाठी मोठा संघर्षही केला.
मुंबईतला स्ट्रगल, दोन लग्न आणि... मुंबईत राजपालने खूप मोठा स्ट्रगल केला. अगदी या काळात रिक्षाच्या भाड्यालाही त्याच्याकडे पैसे नसायचे. राजपालच्या खासगी आयुष्यातही त्याला मोठा संघर्ष करावा लागला. त्याची दोन लग्न झालीत. पहिलं लग्न लखीमपूरच्या करूणा यादवसोबत झालं. परंतु मुलीला जन्म देताच अर्थातच प्रसूतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. 2003 मध्ये राजपाल यादवने 2003 दुसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. राजपाल यादव आणि राधाची भेट कॅनडात झाली होती. पहिल्याच भेटीत राजपालला राधा आवडली होती. राजपाल आणि राधा यांच्या मुलीचं नाव हनी यादव असं आहे.