चेक बाऊन्सप्रकरणी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. राजपाल नुकतीच आपली ही शिक्षा पूर्ण करून मुंबईत परतला आहे. त्यावेळी त्याने या प्रकरणाविषयी लोकमतसोबत मारल्या एक्सक्ल्युजिव्ह गप्पा...
तुम्हाला ज्या चेक बाऊन्सप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती, हे प्रकरण काय होते हे थोडक्यात सांगाल का?२०१२ मध्ये देखील मी या प्रकरणाविषयी बोललो होतो. बॉलिवूडचे चित्रपट हे इन्वेस्टमेंट अथवा पैसे उसने घेऊनच बनवले जातात. मी चित्रपट बनवण्यासाठी एका कंपनीकडून पैसे घेतले होते आणि त्यात माझे देखील काही पैसे टाकले आणि चित्रपट बनवला. या व्यवहारात माझ्या गावातील मंडळी असल्याने मी कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना जास्त काही विचार केला नाही की ती खोलवर वाचली नाहीत. पण मी स्वाक्षरी केली हे जरी चुकीचे असले तरी मी पळून कुठे गेलेलो नाही की ही गोष्ट मी कधी नाकारली नाही. मी काही अनेक लोकांकडून पैसे घेऊन त्यांना फसवलेले नाही. पण या पाच करोडमुळे अनेक करोडचे नुकसान झाले आहे याचा कोणी विचार करत नाही. या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. ही केस कोणी सुरू केली हे मला माहीत नाही. पण या केसचा शेवट मी करणार. पण यातून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो आहे की, अभिनेता म्हणून मला ऑटोग्राफ द्यायची सवय होती. पण आता कोणतेही कागदपत्र वाचल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करणार नाही.
तुमच्या आयुष्याला असे काही वळण मिळेल असा कधी विचार केला होता का?आपण विचार करतो त्याप्रकारे आपल्या आयुष्यात कधीच घडत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या वळणामुळेच आपल्याला नव्या गोष्टी शिकायला मिळतात. आयुष्यात कितीही वाईट काळ आला तरी थांबायचे नसते. त्यातून मार्ग काढायचा असतो असेच माझे म्हणणे असते.
तीन महिने कारागृहात असताना तुमचा दिनक्रम कसा असायचा?मला तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली, त्यावेळी आपल्या कायद्याचा आदर करून मी आनंदाने त्याचा स्वीकार केला. तिथे उठण्याची, खाण्याची वेळ ही ठरलेली असायची. ठरलेल्या वेळातच सगळी कामे करायला लागायची. मी तिथे असताना वाचन केले, व्यायाम केला, गायन आणि नृत्य शिकलो. एवढेच नव्हे तर तिथे मी राजपाल की पाठशाला देखील सुरू केली होती. तिथे असलेल्या आरोपींना मी अभिनयाचे धडे द्यायचो. तेथील अनेकांना चित्रपटांची आवड होती आणि त्यांनी अनेक चित्रपट देखील पाहिले होते. सुरुवातीला ते लोक सेलिब्रेटी म्हणून मला भेटायला यायचे. पण माझ्याशी काही वेळा बोलल्यानंतर पडद्यावरचा राजपाल वेगळा आहे आणि हा राजपाल वेगळा असे लोकांना वाटायचे. मी तिथे जाऊन देखील लोकांना हसवले. कारण माझा जन्मच लोकांना हसवण्यासाठी झाला आहे.
बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसल्याने तुम्हाला या क्षेत्रात यायला खूप संघर्ष करावा लागला होता का?संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. कितीही मोठा सुपरस्टार असला तरी त्याला त्याचे स्टारडम टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोच. संघर्ष करतानाच आपल्याला चांगले वाईट अनुभव मिळतात. संघर्ष नसेल तर आयुष्यात काहीच नाहीये असे मला वाटते. संघर्षाचे दुसरे नाव हे सुरुवात आहे असेच मी म्हणेन.