अभिनेते राजपाल यादववर (Rajpal Yadav) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील नौरंग यादव यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. दिल्लीत एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजपाल यादव शूटसाठी थायलंडमध्ये होता. वडिलांची तब्येत गंभीर असल्याचं कळताच तो कालच दिल्लीत पोहोचला. आज त्याच्या डोक्यावर पित्याचं छत्र हरपलं आहे. सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार त्याच्या दु:खात सहभागी आहेत.
नौरंग यादव यांच्या पार्थिवावर उत्तर प्रदेशमधील त्यांच्या मूळ गावी शाहजहापूर येथे होणार असल्याचं कळत आहे. राजपाल यादव वडिलांच्या खूप जवळ होता. २०२१ मध्ये त्याने नावासमोर वडिलांचं नाव अॅड केलं होतं. राजपाल यादव नाही तर राजपाल नौरंग यादव असं पूर्ण नाव सगळीकडेच घ्यायला सांगितलं. अभिनेता एकदा म्हणाला होता की," सगळेच आपल्या वडिलांसाठी काही ना काही करतात. आपण आपल्या वडिलांसाठी काय करु शकतो असं मला वाटायचं. पासपोर्टवर जे नाव आहे राजपाल नौरंग यादव त्यावरुन मला वाटलं की मी राजपाल यादवला नौरंग यांच्यासमोर समर्पित करतो." त्याच्या या स्टेटमेंटवरुन त्याचं वडिलांवरचं प्रेम दिसलं होतं. आज त्याच वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याने राजपाल यादवला साहजिक धक्का बसला आहे.