Join us

Raju Srivastav Passed Away: राजू श्रीवास्तव यांचे पार्थिव रूग्णालयातून बाहेर आणताना चाहते गहिवरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 6:50 PM

राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव एम्स रुग्णालयामधून बाहेर आणतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. सुमारे ४२ दिवस दिल्लीतील एम्स रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. १० ऑगस्ट रोजी कार्डिएक अरेस्टनंतर राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमामध्ये होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मधल्या काळात त्यांच्या शरीराची हालचाल झाली होती. मात्र ते शुद्धीवर आले नव्हते. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्यामुळे ते या आजारपणातून उठून बसतील, सर्वांना पुन्हा हसवतील, असे वाटत होते. पण तसे होऊ शकले नाही. अखेर आज डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नसल्याचे सांगितले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला. 

राजू श्रीवास्तव यांचं पर्थिव एम्स रुग्णालयामधून बाहेर आणतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव रुग्णालयामधून बाहेर आणतानाचा फोटो पोस्ट केला आहे.  हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या लाडक्या कलाकाराला श्रद्धांजली देताना चाहते भावूक झाले आहेत. 

राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी कानपूर येथे झाला होता. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव प्रसिद्ध कवी होते. बलाई काका नावने ते कविता करायचे. कवीचा मुलगा म्हटल्यानंतर लहानपणी सगळे राजू यांना कविता म्हणायला सांगायचे. पुढे पुढे राजू बर्थ डे पार्टीमध्ये कविता ऐकवू लागले होते. 

१९८२ साली राजू श्रीवास्तव मुंबईत आले. बॉलिवूड चित्रपटांत छोटे मोठे रोल करत त्यांनी करिअरची सुरूवात केली. २००५ साली मात्र या कलाकाराचं नशीब फळफळलं. स्टार वनच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये त्यांनी भाग घेतला आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. कॉमेडियन म्हणून त्यांना नवी ओळख मिळाली. यापश्चात बिग बॉस ३, नच बलिए अशा शोमध्ये ती दिसले

टॅग्स :राजू श्रीवास्तव